विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर प्रदेश काँग्रेसकडून कारवाईच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांना काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोटे आरोप करून पक्षशिस्तीला काळीमा फासला असून त्यांना निलंबित का करू नये यासंदर्भात 2 दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विचारमंथन करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे 28 नोव्हेंबर रोजी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर टिळक भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्षांबाबत खोटी व बदनामी करणारी विधाने केली आहेत. त्यांनी काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे, पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.