अयोध्येतील राममंदिर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एसटीएफ प्रमुखांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शारीक आणि जुबेर खान नावाने हा ई-मेल पाठवण्यात आला होता. प्रत्यक्षात ते ताहर सिंह आणि ओमप्रकाश मिश्रा असून हे षड्यंत्र भारतीय गोसेवा परिषदेचा अध्यक्ष देवेंद्र तिवारीने रचले होते, तिवारी भाजपशी संबंधित आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेस व सपाने केला आहे.
भाजपच्या या षडयंत्राची पोलखोल काँग्रसने एक्स अकाऊंटवरून व्हीडियो पोस्ट करून केली आहे. ज्या देवेंद्र तिवारीने हे षडयंत्र रचले होते त्याचे पह्टो योगी आदित्यनाथसोबत यापुर्वी अनेकदा छळकले आहेत. मुस्लिम नावाने हा ई-मेल पाठवण्यात आला. तसेच या ई-मेलमध्ये मुस्लिम नागरिकांना कशी चुकीची वागणूक दिली जाते. त्यांना छोटया-छोटय़ा गोष्टींसाठी तुरुंगात डांबले जाते. कधी खाण्यावरून कधी नमाज पढण्यावरून त्रास दिला जातो, याबाबत ई-मेलद्वारे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
राम मंदिर उद्घाटनाचा दिवस जवळ येत असताना मुस्लिम धर्मियांची बदनामी करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही धमकीच्या ई-मेलद्वारे करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणावरून काँग्रेसने मोदी सरकारवर व्हीडियोच्या माध्यमातून तोफ डागली आहे. हिंदू – मुस्लिम यांच्यात भांडणे लावण्याचे पाप भाजप करत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
नावे समजल्यानंतर योगींच्या बुलडोझरमधले डिझेल संपले
प्रसिद्धीसाठी हे सर्व केल्याचे देवेंद्र तिवारीने सांगितले. दोन मुस्लिम धर्मियांनी धमकीचा ई-मेल पाठवल्याचे कळताच ताबडतोब युपीच्या बाबाचा म्हणजेच योगी आदित्यनाथचा बुलडोझर निघाला होता. पण, जसे दोघे हिंदु असल्याचे आणि भाजपशी संबंधित असल्याचे कळले तसे बुलडोझरमधले डिझेल संपले असा टोलाही काँग्रेसने व्हीडियोद्वारे लगावला आहे.