सत्तेसाठी आश्वासनांचा पाऊस पाडत महायुतीने शेतकरी आणि मच्छिमारांना फसवले, काँग्रेसचे रत्नागिरीत आंदोलन

शेतकरी आणि मच्छिमारांमध्ये महायुती सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मच्छिमार आणि शेतकऱ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन महायुती सरकारने त्यांची फसवणूक केली आहे. सत्ता मिळवण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडून सरकारने शेतकरी आणि मच्छिमारांची फसवूणक केल्याचा आरोप करत आज काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण छेडण्यात आले.

काँग्रेसने आजच्या आंदोलनात स्थानिक विषयांवर प्रकाशझोत टाकला. जिल्ह्यातील शेतकरी, आंबा बागायतदार आणि मच्छिमार यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष नाही. मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्षे पूर्ण होत नाही. सरकार दरवर्षी नवीन तारखा जाहीर करते. मंत्री बदलतात मात्र महामार्ग बदलत नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे. महामार्गावर ज्या ठिकाणी काम झाले आहे त्याच्या दर्जाबाबतही काँग्रेसने संशय व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी रस्ता किंवा संरक्षक भिंत खचली असल्याच्या घटना घडल्या असल्याचे काँग्रेसने आपल्या निवेदनात म्हटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे. शासकीय जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. अनेक पदे रिक्त आहेत. शिकाऊ डॉक्टर रुग्णांवर इलाज करत आहेत. शासकीय रुग्णालयाची इमारत मोठी झाली आहे. नवीन शस्त्रक्रिया विभाग बांधण्यात आला आहे. मात्र त्या विभागात शस्त्रक्रिया करण्यासाठी शल्य चिकित्सक नाही, अशी दयनीय अवस्था झाल्याची खंत काँग्रेसने मांडली आहे.

अपघात विभाग पूर्णपणे शिकाऊ डॉक्टरांवर सुरु असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. मिरकरवाडा बंदर हे देशाला परकीय चलन मिळवून देते. मात्र या बंदरातील मच्छिमारांच्या मुलभूत गरजेकडे सरकारने दुर्लक्ष केल्याची टीका काँग्रेसने केली आहे. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे प्रभारी मनिष राऊत, समन्वयक सहदेव बेटकर, रुपाली सावंत, जिल्हा उपाध्यक्ष हरिष शेकासन, शहराध्यक्ष रमेश शहा, अशोक जाधव, अॅड. अश्विनी आगाशे, मच्छिंद्रनाथ मांजरेकर, अनिता शिंदे, अस्लम शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मनिष राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. महायुती सरकारने शेतकरी आणि मच्छिमारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे जिल्हा समन्वयक सहदेव बेटकर यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला. राज्यात खून आणि बलात्काराच्या घटना घडत आहेत. स्वारगेट येथील घटनेनंतर राज्यातील महिला सुरक्षित नाहीत हे स्पष्ट झाले आहे. जनतेच्या सुरक्षेबाबत सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याची टीका बेटकर यांनी केली.