अमित शहांविरोधात काँग्रेसचे रणशिंग; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशभरात आंदोलन करणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आता रणशिंग फुंकले आहेत. काँग्रेस पक्ष 26 जानेवारीपर्यंत देशभर आंदोलन उभारणार आहे.या दरम्यान 22 आणि 23 डिसेंबर रोजी काँग्रेस नेते 150 हून अधिक शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. 27 डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगावात मोठी रॅली होणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

वेणुगोपाल म्हणाले की, संसदेच्या अधिवेशनात राज्यघटनेवर झालेल्या चर्चेदरम्यान अमित शाह यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचा अपमान केला आहे. शहा यांच्या वक्तव्यामुळे सर्वजण दुखावले आहेत. आजपर्यंत अमित शहा किंवा पंतप्रधानांनी माफी मागितलेली नाही. काँग्रेस हा मुद्दा प्रजासत्ताक दिनापर्यंत म्हणजेच 26 नेवारीपर्यंत देशभरात मांडणार आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही माहिती दिली होती की, लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेस खासदार आणि CWC सदस्य देशभरातील 150 वेगवेगळ्या शहरांमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करतील.