जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर आधी ग्रेनेड हल्ला केला आणि मग गोळीबार केला. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले. तर 5 जवान जखमी झाले. काँग्रेसने या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शहीद जवानांबद्दल शोक व्यक्त केला आहे. कठुआतील दहशतवादी हल्ला म्हणजे रणनीतीचे अपयश आहे, अशी गंभीर टीका काँग्रेसने केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याची घटना अतिशय दुखद आहे. हल्ल्यात 5 जवान शहीद तर 5 जवान जखमी झाले. शहीद जवानांना आम्ही श्रद्धांजली वाहतो. हा हल्ला निषेधार्ह आहे. फक्त काँग्रेसच नाही तर प्रत्येक नागरीक या क्षणाला शहीद जवानाच्या कुटुंबीयांसोबत आहे. एका महिन्यातील हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे. सतत सुरू असलेल्या दहशतवादी हल्ले चिंताजनक आहेत, असे काँग्रेसने म्हटले.
केंद्र सरकार दहशतवादी हल्ले अपेक्षेप्रमाणे गांभीर्याने घेत नाहीये. सरकारने हे दहशतवादी हल्ले गांभीर्याने घ्यावेत. दहशतवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. यासाठी आमचा सरकारला पाठिंबा आहे. जम्मूच्या पीरपंजाल दक्षिणमध्ये प्रथम दहशतवाद्यांनी आपले केंद्र बनवले आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे, असे नेते दीपेंद्र हुड्डा म्हणाले.
दहशतवाद्यांच्या हालचाली या काश्मीरमधून शिफ्ट होऊन जम्मूमध्ये वाढल्या आहेत. या ट्रेंडवर काँग्रेसने आधीही चिंता व्यक्त केली आहे. लष्कराची तैनाती पाकिस्तानच्या बाजूने कमी आणि लडाखकडे होत असल्याने हे दहशतवादी हल्ले होत असल्याचे कारण सांगितले जात आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावं, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. सरकारने आधीपासून सावध रहायला हवं होतं. पण मोदी सरकार जम्मू-काश्मीरमधील वस्तूस्थितीबाबत गंभीर नाही. मोदी सरकार हे आपलं नरेटिव्ह देशासमोर मांडण्यात व्यग्र आहे, असे लष्कराशी संबंधित तज्ज्ञांचे मत असल्याचे काँग्रेसने म्हटले.