
विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडून त्यांच्यावर आरोप करणारे नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बंटी शेळके यांना काँग्रेसने आज कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिसीवर दोन दिवसांत लेखी खुलासा करण्याची सूचना काँग्रेसने शेळके यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. या कालावधीत खुलासा न मिळाल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी काँग्रेसने 28 नोव्हेंबरला टिळक भवन येथे पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना बंटी शेळके यांनी निवडणुकीतील पराभवाला पटोले यांना जबाबदार धरले होते. तसेच नाना पटोले 100 टक्के राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत, असा आरोपही शेळके यांनी केला होता.