राहुल गांधींनी घेतली हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट; सर्वोतोपरी मदतीचं आश्वासन

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. शुक्रवारी सकाळी राजधानी दिल्लीतून रस्तेमार्गाने हाथरसच्या दिशेने रवाना झाले. सुरुवातीला हाथरस दुर्घटनेत जीव गमावलेल्या अलीगढ येथील दोन पीडित कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी भेट घेतली आणि त्यानंतर ते हाथरसकडे रवाना झाले.

हाथरसमध्ये भोलेबाबाच्या सत्संग कार्यक्रमामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 123 जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिचणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी राहुल गांधी अलीगढच्या पिलखना गावात पोहोचले. येथे त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.

याभेटीदरम्यान राहुल गांधी यांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिल्याचे पीडित कुटुबाने माध्यमांशी बोलताना सांगितले. काँग्रेस पक्ष या कठीण प्रसंगी तुमच्या पाठीशी असून पक्षातर्फे सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिल्याचे पीडित कुटुंबाने सांगितले. तसेच दुर्घटनेबाबतही त्यांनी माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

हाथरसमध्ये 3 पीडित कुटुंबीयांची भेट घेतली

राहुल गांधी अलीगढहून हाथरसला पोहोचले असून तिथे तीन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. हाथरस दुर्घटनेत जीव गमावलेल्या नवीपूर खुर्दच्या रहिवासी मुन्नी देवी आणि आशा देवीसह जखमी झालेल्या माया देवीच्या कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी भेट घेतली.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या हाथरस दौऱ्यामुळे येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बाबा फरार

सत्संगमधील चेंगराचेंगरीनंतर भोले बाबा फरार झाला आहे. भोले बाबाच्या सेवेदारांच्या अटकेसाठी पोलीस हाथरस, एटा, कासगंज, मैनपुरी, इटावा, फरुखाबाद, मथुरा, आग्रा आणि मेरठसह अनेक ठिकाणी छापेमारी करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 30 हून अधिक सेवेदारांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.