वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिका केली दाखल

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केले आहे. यातच संसदेने मंजूर केलेल्या वक्फ विधेयकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी ही याचिका दाखल केली आहे. तर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करत म्हटलं आहे की, “हे मुस्लिम समुदायाविरुद्ध भेदभाव करणारे आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे विधेयक आहे.” वक्फ सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केले आहे आणि आता ते राष्ट्रपतींच्या संमतीच्या प्रतीक्षेत आहे.

दरम्यान, याआधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी असे जाहीर केले होते की, द्रमुक वक्फ सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल. स्टॅलिन म्हणाले होते की, तामिळनाडू ही लढाई लढेल आणि यशस्वी होईल. त्यांनी आठवण करून दिली की, 27 मार्च रोजी तामिळनाडू विधानसभेने वक्फ सुधारणा विधेयक मागे घेण्याचा आग्रह करणारा ठराव मंजूर केला होता. त्यात म्हटले आहे की, यामुळे धार्मिक सौहार्द बिघडेल आणि अल्पसंख्याक मुस्लिम समुदायावर त्याचा विपरीत परिणाम होईल.