संसदेत जाताना माझ्याकडे फक्त पाचशेची नोट असते, ते नोटांचं बंडल माझं नाही; अभिषेक मनु सिंघवींनी आरोप फेटाळले

अदानी समूहावरील आरोपांची जेपीसी चौकशी करण्याच्या मागणीसाठी संसदेत आणि संसदेबाहेर ‘इंडिया’ आघाडीने रान उठवलेले असताना शुक्रवारी राज्यसभेत धक्कादायक घटना घडली. राज्यसभेत काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या बाकाखाली 500 च्या नोटांचे बंडल सापडल्याने गोंधळ उडाला. सभापती जगदीप धनखड यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे म्हणत चौकशीचे आदेश दिले. आता यावर अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली असून सर्व आरोप फेटाळले आहेत.

माध्यमांशी बोलताना अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, हे मी पहिल्यांदाच ऐकत असून आश्चर्यचकित झालो आहे. मी जेव्हा राज्यसभेमध्ये जातो तेव्हा माझ्याकडे फक्त 500 रुपये असतात. मी काल दुपारी 12.57 वाजता संसदेत पोहोचलो आणि 1 वाजता संसदेची कार्यवाही स्थगित झाली. त्यानंतर 1.30 वाजेपर्यंत मी खासदार अयोध्या प्रसाद यांच्यासोबत संसदेतील उपहारगृहामध्ये बसलो आणि नंतर बाहेर गेलो. तिथून

दोन वाजता सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी असल्याने मी तिकडे गेलो. मी संसदेमध्ये फक्त 3 मिनिटं होतो. प्रत्येक सदस्याच्या बाकाजवळ काचेचा बॉक्स बनवायला हवा. त्याला कुलुप लावायला हवे. सदस्याला बसायचे असेल तर तो ते उघडून आत बसेल. कारण आता बाकंही सुरक्षित राहिलेली नाहीत. या प्रकरणाची निश्चित चौकशी व्हायला हवी. हा प्रकार गंभीर आणि हास्यास्पद असून राजकीय खेळ सुरू असल्याचेही ते म्हणाले.


नक्की प्रकरण काय?

राज्यसभेची कार्यवाही सुरू झाल्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी सदनामध्ये नोटाचे बंडल सापडल्याची माहिती दिली. गुरुवारी राज्यसभेची कार्यवाही स्थगित झाल्यानंतर सीट नंबर 222 जवळ 500 रुपयांच्या नोटाचे बंडल सापडल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली. ही सीट तेलंगाणाचे काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांची असून नियमानुसार याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे धनखड यांनी सांगितले. यानंतर राज्यसभेत गोंधळ सुरू झाला.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आक्रमक झाले आणि जोपर्यंत चौकशी सुरू आहे आणि काही स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही (सभापती) त्यांचे (अभिषेक मनु सिंघवी) नाव घेण्याची आवश्यकता नव्हती. अशी चिल्लर कामे करून देशला बदनाम केले जात आहे. तुम्ही (सभापती) एखाद्याचे नाव किंवा त्याच्या बाकाबाबत कसे बोलू शकता? असा सवालही खरगे यांनी केला. यानंतर सत्ताधाऱ्यांनीही गोंधळ घालण्यास सुरुवात केली.