छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊन एक वर्ष झाल्यानंतरही या कारखान्याच्या राजकारणातील सतेज पाटील विरुद्ध अंमल महाडिक वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सत्ताधारी महाडिक यांच्याकडून विरोधी गटाच्या सभासदांचे ऊस कारखान्यात घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत आमदार सतेज पाटील यांनी साखर संचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढत तक्रार दाखल केली आहे.
यावेळी साखर सहसंचालक जी. जी. मावळे यांना निवेदन देण्यात आले. तसेच सरकारने यामध्ये त्वरित हस्तक्षेप करावा. तीन वर्षे ऊस न नेल्यास पोटनियमानुसार सभासदत्व रद्द होते. आता ऊस गेला नाही तर, सभासदत्व रद्द होईल. त्यामुळे पुढील आठ दिवसांत सत्ताधाऱयांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा सभासदांना घेऊन स्वतः कारखान्यावर धडक देणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिला.
शेतकरी संघटनेच्या ऊस आंदोलनामुळे यंदा अगोदरच उसाचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. त्यात यंदा ऊस कमी असल्याने हंगाम लवकर संपण्याची चिन्हे असतानाच, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात मात्र, सत्ताधारी महाडिक गटाकडून विरोधी गटातील सभासदांचे ऊस कारखान्याला घेऊन जाण्यासाठी टाळाटाळ होत आहे. निवडणुकीत विरोधात प्रचार केलेल्या सभासदांना त्रास दिला जात आहे. जिह्यात उसाची कमतरता असताना विरोधक गटातील सभासदांचे ऊस उचलण्याऐवजी कारखाना दोन तास बंद ठेवावा लागत आहे. कारखान्याच्या पावती पुस्तकांमध्ये पावतीसमोर विरोधक लिहिले जात असल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला.
राजकीय द्वेषातून विरोधकांचा मोर्चा
– विरोधकांनी राजकीय द्वेषातून हा मोर्चा काढला असून, यंदा मराठा आणि शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे हंगाम उशिरा सुरू झाला. यामुळे ऊस जाण्यासाठीही उशीर झाला आहे. विरोधी सभासदांच्या समोर विरोधक असा उल्लेख कुठेही केलेला नाही. ऊस कधी तोडायला येईल याची प्रत्येकाला तारीख सांगितलेली असते. त्यामुळे विरोधकांचा ऊस न घेण्याबाबतचा कोणताही प्रकार या कारखान्यात झाला नाही. कारखाना प्रशासनाकडून कधीही असला प्रकार करण्यात आलेला नाही. पण ज्यांनी स्वतःचा कारखाना खासगी केला, त्यांनी त्यांच्या कारखान्यावरील सभासदांसाठीदेखील मोर्चा काढावा, असा टोला कारखान्याचे अध्यक्ष अंमल महाडिक यांनी लगावला.
कारखान्याचे एमडी प्रकाश चिटणीस यांना मारहाण
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यातील राजकीय संघर्षाने आज हिंसक वळण घेतले. विरोधकांचा ऊस जाणीवपूर्वक घेण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ आज सायंकाळी छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे एमडी प्रकाश चिटणीस यांना सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते संदीप नेजदार यांच्याकडून मारहाण करण्यात आली. गाडीतून ओढून कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आल्याने कसबा बावडा परिसरात वातावरण तंग झाले होते.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रकाश चिटणीस काम आटोपून कसबा बावडा मुख्य मार्गावरून जात असताना पाटील गल्लीसमोर संतप्त शेतकऱयांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांना जाब विचारत सतेज पाटील गटाचे माजी स्थायी सभापती व नगरसेवक संदीप नेजदार यांच्यासह कार्यकर्त्यांनी चिटणीस यांना गाडीतून ओढून मारहाण केली. या मारहाणीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. सायंकाळी महाडिक गटाचे कार्यकर्ते जमू लागल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला होता.