पंतप्रधान मोदी राहुल गांधींना घाबरले; काँग्रेस नेते चेनिथल्ला यांचा भाजपवर हल्ला

‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी संपूर्ण देश पिंजून काढला. ठिकठिकाणी जनतेने त्यांना उदंड प्रेम दिले. याचाच दणका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींना घाबरले असून त्यांना बदनाम करण्याचा घाट घातला आहे, असा हल्लाबोल आज काँग्रेसचे महाराष्ट्र पक्ष निरीक्षक रमेश चेनिथल्ला यांनी भाजपवर केला. वाढती महागाई, भ्रष्टाचार आणि देशातील माजलेल्या अराजकतेविरोधात चेनिथल्ला यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली.

काँग्रेसची कोकण विभागीय बैठक आज भाईंदर पश्चिमेच्या मॅक्सेस मॉलमध्ये पार पडली. यावेळी माजी आमदार मुइझफर हुसेन, माजी खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, प्रवक्ते प्रकाश नागणे, अनिल सामंत, राजीव मेहरा, जुबेर इनामदार, रूपा पिंटो महिला जिल्हाध्यक्ष, युवा काँग्रेसचे सिद्देश राणे, युवक अध्यक्ष कुणाल काटकरसह हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

नितेश राणे छोटा माणूस.. दंगलींसाठी भाजपची धडपड

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, नितेश राणे छोटा माणूस आहे. त्यांना पुढे करून काहीजण दंगली घडवण्याची धडपड करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यावर सूडबुद्धीने गुन्हे

सोयाबीनला भाव मिळत नसल्याने बुलढाण्यातील शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहून पाठवले. त्यामुळे तिळपापड झालेल्या सरकारने या शेतकऱ्यावर सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल केले. अशा प्रकारे अनेक ठिकाणी अन्नदात्या बळीराजाची गळचेपी सुरू आहे. या पापाची परतफेड भाजप-मिंधे गटाला विधानसभा निवडणुकीत चुकवावी लागेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. नितेश राणे पोलिसांना खुलेआम शिव्या देतात. हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावण्याचे उद्योग सुरू असताना पोलीस शांत आहेत. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या भडकावू भाषणे देणाऱ्यांवर कारवाई का करत नाहीत? त्या भाजपचे तर काम करत नाहीत ना, असा सवाल पटोले यांनी केला.