
महाराष्ट्र विधानसभेतील दारुण पराभवानंतर नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करत काँग्रेस नेतृत्वाने आज प्रदेशाध्यक्षपदी बुलढाण्याचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज सपकाळ आणि वडेट्टीवार यांची नियुक्ती केल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के. वेणूगोपाळ यांनी दिली. विदर्भातील बुलढाण्याचे सपकाळ हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. युवक काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱया पार पाडल्या आहेत. महाराष्ट्रातील पराभवानंतर कोणताही प्रस्थापित नेता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यासाठी उत्सुक नव्हता. त्या वेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी या पदासाठी इच्छा प्रदर्शित केली आणि पक्षाने आज त्यांची नियुक्ती केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेल्या विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करून काँग्रेस हायकमांडने राज्यातील प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी अमित देशमुख, सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांची नावे चर्चेत होती. मात्र या प्रस्थापित नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी रस न दाखवल्याने हर्षवर्धन सपकाळ यांना ही संधी मिळाली आहे.