विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल अत्यंत आश्चर्यजनक आणि हे निकाल शाहू-फुले- आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात अपेक्षित नाहीत. विरोधी पक्षाला पूर्णपणे दाबून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी चालली आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे, अशी खंत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला, पण त्यांनी समाजमाध्यमातून मतदारांचे आभार मानले आणि संपूर्ण महाराष्ट्रात लागलेल्या निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
राज्यातील मतदारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, ‘ज्या ज्या मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केले त्याचे आभार मानले, पण निकाल आश्चर्यजनक आहेत. हे निकाल अपेक्षित नाहीत. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी केलेली आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे. पण नक्कीच काही तरी झालेले आहे. विरोधी पक्ष पूर्णपणे दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. ज्या प्रकारे देश चालला आहे त्या सर्व गोष्टी आपण आवर्जून बारीकपणे बघितल्या पाहिजेत आणि त्यावर काय पावले उचलायची ती उचलली पाहिजे. शाहू-फुले- आंबेडकरांचा हा महाराष्ट्र अशा प्रकारचा निकाल नाही देऊ शकत याच्यावर माझा विश्वास आहे. पराभूत झाले असतो तरी हा काही शेवट नाही. आमची लढाई लोकशाही वाचवण्याची आहे आणि ती लढाई सुरू राहील. विरोधी पक्ष म्हणून आम्ही ते करणारच आहोत. तुमचे पाठबळ आमच्या पाठीशी राहावे अशी अपेक्षा आहे. लोकशाहीत जर कोणी काही गडबड करू इच्छित असेल तर आपण त्याच्याकडे कटाक्षाने पाहिले पाहिजे,’ असे आवाहन त्यांनी केले.