राज्यातली विधानसभेचा निकाल हा आश्चर्यजनक आहे आणि हा निकाल अपेक्षित नव्हता असे विधान काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले आहे. तसेच लोकशाहीत जर कोणी गडबड करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याकडे आपण कटाक्षाने पाहिले पाहिजे असेही ठाकूर म्हणाल्या.
फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करून यशोमती ठाकूर म्हणाल्या की, निकाल आश्चर्यजनक आहेत, हे निकाल अपेक्षित नव्हते, आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात खेळी खेळली गेली आणि ही खेळी समजण्यापलीकडे केली गेली आहे. विरोधी पक्ष संपूर्णपणे या ठिकाणी दाबून देण्याचा प्रयत्न झाला आहे. ही बाब लोकशाहीच्या विरोधात आहे. ज्या प्रकारे देश चालला आहे, या सगळ्या गोष्टींकडे आपण पाहिल्या पाहिजे आणि त्यावर योग्य पावलं उचलली पाहिजे. माझा शिव-शाहु-फुले- आंबेडकरांचा महाराष्ट्र अशा प्रकारचा निकाल नाही देऊ शकत यावर माझा विश्वास आहे. पराभूत झालो तरी हा अंत नाही, लोकशाही वाचवण्याची आमची लढाई आहे. ही लढाई विरोधी पक्षनेते म्हणूनु लढणारच आहोत. लोकशाहीत जर गडबड कोणी करू इच्छित असेल तर आपण त्याकडे कटाक्षाने पाहिलं पाहिजे एवढी विनंती असेही ठाकूर म्हणाल्या.