बदलापूरच्या अक्षय शिंदेसारखे बीडच्या आरोपींनाही संपवले जाऊ शकते, वडेट्टीवार यांनी व्यक्त केली शक्यता

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा अद्याप काहीच थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. सीआयडीलाही सापडत नाहीत मग ते कुठे लपलेत, त्यांचे काय झाले अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुख्य आरोपीपर्यंत पोहोचता येऊ नये म्हणून बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला चकमकीत ठार केले गेले, तसेच बीडच्या आरोपींबाबत होऊ शकते, अशी शक्यता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज व्यक्त केली.

विजय वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बीड प्रकरणावरून महायुती सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये हाच फरक आहे. पूजा चव्हाण हत्याप्रकरणी आरोप होताच महाविकास आघाडी सरकारने संजय राठोड यांना मंत्रिपदावरून दूर केले होते. महायुती सरकारने मात्र धनंजय मुंडेंबाबत काहीच भूमिका घेतलेली नाही, असे सांगत या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

प्रेम करून मारहाण करतात, सोडूनही देतात. तुमची परवानगी असेल तर दहा-दहा बायका करा, पण कोणाचा खून तरी करू नका, असे म्हणत वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेंवर शरसंधान केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची हत्या झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय त्यात तथ्य असू शकते, असे सांगत त्यांनी बदलापूरच्या अक्षय शिंदे प्रकरणाचा दाखला दिला.

आकाच्या वर काका बसलाय, तो आरोपींना वाचवतोय

बीडमध्ये महिलांच्या शोषणाच्याही अनेक घटना घडल्या आहेत. सरकारने यासंदर्भात सीबीआय चौकशी केली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. आकाच्या वर काका आहे, तो सर्व आरोपींना वाचवतोय, असा आरोपही त्यांनी केला. पोलिसांना सापडलेल्या आरोपींच्या मोबाईल फोनमधील कॉल रेकॉर्ड तपासले गेले तर आरोपींनी कोणत्या मोठ्या माणसाला फोन केला हे उघड होईल, असेही ते म्हणाले.