भाषणातील म्हणीवर कुणाचा कसा आक्षेप असू शकतो?‘शिवलिंगावरील विंचू’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा भाजप नेत्यांना सवाल

शिवलिंगावर बसलेला विंचू असतो, ना हाताने काढता येत ना चपलेने मारता येत, असे विधान काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले होते. याविरोधात त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, थरुर यांचे भाषण एका साहित्यिक कार्यक्रमातील असून भाषणातील म्हणीवर कुणाचा कसा आक्षेप असू शकतो? असा सवाल सर्वोच्च न्यायालायने भाजप नेत्यांना केला. तसेच थरूर यांच्याविरुद्ध दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला स्थगितीही दिली. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली राज्य आणि तक्रारदार तसेच भाजप नेते राजीव बब्बर यांना नोटीस बजावून चार आठवडय़ांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवलिंगावर विंचू बसलेला असतो, ना हाताने काढता येत ना चपलेने मारता येत असे वक्तव्य थरूर यांनी भाषणात केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी याचा संदर्भ दिल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

थरूर यांची बाजू काय?

एका साहित्यिक कार्यक्रमात थरूर यांनी ही टीप्पणी केली होती. ज्यात थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही घेतले नव्हते. कुणी जगू शकत नाही आणि कुणी मरू शकत नाही, अशा परिस्थितीचा उल्लेख थरूर यांनी आपल्या म्हणीद्वारे केला होता. शशी थरूर यांचे हे विधान 2012 मध्ये एका मासिकात प्रसिद्ध झाले होते, तेव्हा कुणी आक्षेप घेतला नाही. पण, जेव्हा 2018 मध्ये एका कोटमध्ये सांगितले गेले तेव्हा काही लोकांचा आक्षेप होता, याकडे थरूर यांचे वकील मोहम्मद अली खान यांनी लक्ष्य वेधले.