काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील (84) यांचे आज निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होते. उद्या दुपारी अकरा वाजता एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

रोहिदास पाटील यांचे वडील चुडामण पाटील स्वातंत्र्यसैनिक आणि खासदार होते. वडिलांचा राजकीय वारसा रोहिदास पाटील यांनी चालविला. रोहिदास पाटील यांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्याचे मंत्रीपद भूषवले होते. उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. ते सर्व प्रथम 1972 ते 1978 या काळात ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर 1980 ते 1985 या काळात विधानसभा सदस्य होते. त्यानंतर 1986 ते 1990 या काळात विधान परिषद सदस्य त्यानंतर 1990 ते 2009 पर्यंत असा सलग 25 वर्षांच्या काळात ते आमदार होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रीपदही भूषविले होते. महसूल, कृषी आणि पशुवर्शधन, ग्रामविकास, पाठबंधारे या खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.