चीन आपल्यापेक्षा 10 वर्षांनी पुढे, मेक इन इंडियावरून राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका

चीनकडे मजबूत औद्योगिक क्षेत्र आहे, चीन आपल्यापेक्षा 10 वर्षांनी पुढे आहे असे विधान काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. तसेच मेक इन इंडिया ही सपशेल अपयशी ठरलेल्या योजनेचा पंतप्रधान मोदी यांनी संसदेतल्या भाषणात साधा उल्लेखही केला नाही असेही राहुल गांधी म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात मेक इन इंडियाचा साधा उल्लेखही केला नाही. मेक इन इंडिया हा चांगला प्रयत्न होता, तरी ती सपशेल अपयशी ठरली. उत्पादन क्षेत्र हे 2014 साली जीडीपीच्या 15.3 टक्क्यांवरून 12.6 टक्क्यांवरून घसरले. ही घट गेल्या 60 वर्षात सर्वाधिक आहे.

तसेच हिंदुस्थानी तरुण तरुणींना नोकऱ्यांची नितांत गरज आहे. गेल्या काही वर्षात मग ते युपीएचे सरकार असो किंवा एनडीचे या राष्ट्रीय संकटाशी कुणीही सामना करू शकत नव्हते. उत्पादन क्षेत्रात काय आव्हानं आहेत आणि भविष्यात जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे यावर आपण लक्ष दिले पाहिजे.

हिंदुस्थानात इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी, ऑप्टिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानावर विशेष लक्ष दिले पाहिजे. उत्पादन क्षेत्रात नवीन उभारी घेतली पाहिजे, उत्पादन क्षेत्रात विकसित करून रोजगार निर्मितीचा एकमेव पर्याय आहे.

चीन आपल्यापेक्षा 10 वर्षांनी पुढे आहे. चीनकडे एक मजबूत औद्योगिक व्यवस्था आहे. त्यामुळेच आपल्याला चीनचे आव्हान आहे. चीनशी जर आपल्याला लढायचे असेल तर आपली उत्पादन क्षेत्र सुधारले पाहिजे असेही राहुल गांधी म्हणाले.