आपल्या राजाला वेषांतर करण्याची हौस आहे, पण जनतेत जाण्याची हिंमत नाही! प्रियांका गांधींचे संसदेतील पहिलेच भाषण गाजले

देशातील वातावरण भीतीने भारून टाकले आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांत टीका ऐकून घेण्याची हिंमत नाही, असे सांगत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. प्रियांका म्हणाल्या, कदाचित तुम्ही तुमच्या लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल की, राजा वेषांतर करून बाजारात टीका ऐकण्यासाठी जात असे. प्रजा माझ्याबद्दल काय बोलतेय? मी योग्य मार्गावर चालतोय की नाही? आपले आजचे राजेही वेश बदलतात. आपल्या राजाला वेषांतर करण्याची हौस आहे. पण जनतेत जाण्याची ना त्यांच्यात हिंमत आहे, ना टीका ऐकण्याची, असा टोला त्यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदी यांना लगावला.

आज जनतेला खरे बोलण्यापासून घाबरवले, धमकावले जात आहे. पत्रकार, विरोधी पक्षाचा नेता असो की एखाद्या विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी, कामगार संघटनांना गप्प बसवले जात आहे. कोणावर ईडी तर कोणावर सीबीआय यांच्या माध्यामातून खोट्या केसेस दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विरोधकांना तुरुंगात टाकून त्रास दिला जात आहे. या सरकारने कोणाला सोडले नाही. यांची मीडियाची मशीन खोटी माहिती पसरवते आणि वेगवेगळे आरोप करते. पण कदाचित ती देखील भीतीखालीच जगत आहेत, असे प्रियांका गांधी देशातील राजकीय आणि सामाजिक स्थितीवर बोलताना म्हणाल्या.

संविधान एक सुरक्षा कवच आहे जे देशातील लोकांना सुरक्षित ठेवते. वाईट गोष्ट ही आहे की सत्ता पक्षातील सहकारी जे मोठमोठ्या गोष्टी करतात त्यांनी गेल्या 10 वर्षांत हे सुरक्षा कवच तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. लॅटरल एंट्री आणि खासगीकरणाच्या माध्यमातून हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचे काम करत आहे. जर लोकसभा निवडणुकीत हा निकाल आला नसता तर यांनी संविधान बदलण्याचे काम देखील सुरू केले असते. पण, या निवडणुकीत त्यांना कळून चुकले की, या देशातील जनताच हे संविधान सुरक्षित ठेवेल. हरता हरता जिंकलेल्या सत्ताधाऱ्यांना आता कळून चुकले आहे ही संविधान बदलण्याची चर्चा या देशात चालणार नाही, त्यामुळे ते आता संविधान संविधान करत आहेत, असा टोला प्रियांका गांधी यांनी लगावला.

मी सभागृहात नवीन आहे, फक्त 15 दिवसांपासून येत आहे. पण मला नवल वाटते की 15 दिवसांत इतके मोठमोठे मुद्दे आहेत, पण पंतप्रधान फक्त एका दिवशी 15 मिनिटांसाठी दिसले आहेत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

भारताचे संविधान संघाचे विधान नाही

पंतप्रधान येथे सभागृहात संविधानाचे पुस्तक डोक्याला लावतात. पण संभल, हाथरस, मणिपूर येथे न्यायाची मागणी केली जाते तेव्हा त्यांच्या कपाळावर रेषदेखील दिसत नाही. कदाचित त्यांना समजलेले नाही की भारताचे संविधान संघाचे विधान नाही, असा टोला प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला.

मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, दूध का दूध पानी का पानी होऊदे

राजकीय न्यायाचा विचार केला तर आज सत्ताधारी पक्षातील लोक मागे काय घडले त्याचे दाखले देत आहेत. जे घडले ते 1975 मध्ये झाले, त्यामुळे तुम्हीही ते शिकून घ्या आणि तुमच्या चुकांची माफी मागा त्यासाठी. मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, होऊन जाऊदे दूध का दूध आणि पानी का पानी, असे आव्हान प्रियांका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.

भीती पसरवणारे नेहमी भीतीच्या सावटाखाली राहतात

देशात इंग्रजांच्या काळात जेव्हा गांधींच्या विचारधारेचे लोक स्वातंत्र्याची लढाई लढत होते आणि त्या बाजूच्या विचारधारेचे लोक भीतीमध्ये राहून इंग्रजांबरोबर हातमिळवणी करत होते. पण भीतीचा देखील आपला एक स्वभाव असतो, भीती पसरवणारे देखील स्वतः भीतीचे लक्ष्य ठरतात. हा निसर्गाचा नियम आहे. तेच भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. त्यामुळेच चर्चेला आणि टीकेला घाबरतात. आम्ही किती दिवस चर्चा करण्याची मागणी करत आहोत, पण यांच्यात चर्चा करण्याची हिंमतच नाही, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

हे सरकार केवळ अदानींच्या फायद्यासाठी चाललेय

एका व्यक्तीला वाचवण्यासाठी देशातील 142 कोटी जनतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. सर्व व्यवसाय, सर्व संसाधने, सर्व संपत्ती, सर्व संधी एकाच व्यक्तीकडे सोपवल्या जात आहेत. सर्व बंदरे, विमानतळ, रस्ते, रेल्वेची कामे, कारखाने, खाणी, सरकारी कंपन्या या एकाच व्यक्तीला दिली जात आहेत. जनतेच्या मनात नेहमीच एक विश्वास होता की दुसरे काही नाही तर संविधान आपले रक्षण करेल. पण आज सर्वसामान्यांमध्ये असा समज निर्माण होत आहे की, हे सरकार केवळ अदानींच्या फायद्यासाठी चालत आहे. देशात विषमता झपाट्याने वाढत आहे. जो गरीब आहे तो अधिक गरीब होत आहे, जो श्रीमंत आहे तो अधिक श्रीमंत होत आहे. या सरकारने आर्थिक न्यायाचे संरक्षण कवचही तोडले आहे, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.

पैशाच्या जोरावर सरकारे पाडली

देशात पैशाच्या जोरावर सरकारे पाडली जातात. महाराष्ट्र, हिमाचल, गोवा अशी त्याची अनेक उदाहरणे आहेत. ही सरकारे जनतेने निवडून दिलेली नव्हती का? त्यांना संविधान लागू नव्हते का? संपूर्ण देशातील जनतेला हे माहीत आहे की येथे वॉशिंग मशीन आहे. या बाजूला ज्यांच्यावर डाग आहेत ते त्या बाजूला स्वच्छ होतात, असे प्रियांका म्हणाल्या.