नाना पटोले आता क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करणार! MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहेत. माझगाव क्रिकेट क्लबने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एमसीएमध्ये प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. याचदरम्यान एमसीएच्या अध्यक्षपदासाठी ही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक 23 जुलै रोजी होणार आहे. नाना पटोले हे या निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या महिन्यात 10 जून रोजी एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन झाले. तेव्हापासून एमसीएचे अध्यक्षपद रिक्त आहे. आता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यापूर्वी अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी एमसीएमध्ये माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह भाजपचे माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचाही समावेश आहे.

माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याच्या वृत्ताला नाना पटोले यांनी दुजोरा दिला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. मात्र माझ्या शुभचिंतकांना मी निवडणूक लढवावी असे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे.