ट्रम्प यांच्याशी मैत्री वाढवण्यासाठी PM मोदींनी जिओ-एअरटेलसोबतच्या स्टारलिंक करार करण्यास मदत केली, काँग्रेसचा दावा

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एलोन मस्क यांची कंपनी स्टारलिंक आणि जिओ आणि एअरटेलमधील करारांच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जागतिक टॅरिफ वॉरच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मैत्री वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा करार करण्यास मदत केल्याचा दावा त्यांनी केला. X वर एक पोस्ट करत त्यांनी हा दावा केला आहे.

आपल्या X पोस्टमध्ये जयराम रमेश म्हणाले की, “आतापर्यंत हिंदुस्थानात ज्यावर आक्षेप घेत होता, त्याच स्टारलिंकसोबतची भागीदारी अवघ्या 12 तासांत एअरटेल आणि जिओ दोघांनीही जाहीर केली. यावरून हे स्पष्ट आहे की, पंतप्रधानांनी स्वतः स्टारलिंकचे मालक एलोन मस्क यांच्यामार्फत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी मैत्री वाढवण्यासाठी हा करार सुलभ करण्यास मदत केली.”

आपल्या पोस्टमध्ये जयराम रमेश म्हणाले, अजूनही अनेक महत्त्वाचे प्रश्न शिल्लक आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एखादा मुद्दा असेल, तेव्हा कनेक्टिव्हिटी चालू किंवा बंद करण्याचा अधिकार कोणाकडे असेल? स्टारलिंक की त्याचे हिंदुस्थानातील भागीदार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, इतर सॅटेलाईट आधारित कनेक्टिव्हिटी प्रदात्यांना देखील परवानगी दिली जाईल का? जर हो, तर कोणत्या आधारावर? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टेस्लाबद्दल भाष्य करताना जयराम रमेश म्हणाले, एक मोठा प्रश्न हिंदुस्थानात टेस्लाच्या उत्पादनाबद्दल देखील आहे. स्टारलिंकला हिंदुस्थानात प्रवेश मिळाल्यानंतर टेस्लाकडून देशात कारखाना निर्मानाबाबत काही वचनबद्धता आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.