‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे अन्य शासकीय योजनांचा खोळंबा झाला आहे. बहुतांश निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला जात असल्याने सरकारकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता कापून पगार दिला जाण्याची शक्यता विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज व्यक्त केली.
शेतकरी त्रस्त, मंत्री नाचण्यात व्यस्त
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठवाडय़ात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची चूल पेटली नाही. मात्र राज्याचे कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाकडे हा खरा प्रश्न आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
सरकार अडकले श्रेयवादात
राज्य सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या श्रेयवादात अडकले आहे. या सरकारमधील मंत्री स्वतःच्या मुलीला, जावयाला नदीत ढकला असे म्हणत असेल तर या सरकारकडून जनतेने कोणती अपेक्षा करायची? फसव्या योजनांना महाराष्ट्रातील जनता पंटाळली आहे, असे ते म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 80 ते 85 जागांवर विजय मिळेल. तर 152च्या आसपास जागा जिंकत महाविकास आघाडी सत्तेत येईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.