मोठ मोठे लेझर शो दाखवून मोदींना वाराणसीच्या जनतेला ठगायचंय, अजय राय यांची टीका

एक हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या टाटा एअरबस या प्रकल्पाचे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वडोदऱ्यात उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प सुरुवातील महाराष्ट्रातील नागपूर येथे होणार होता. मात्र गेल्या काही वर्षात भाजपने महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला पळवले आहेत. त्यावरुन उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी मोदी सरकारला फटकरारले आहे. ‘जर मोदींचे वाराणसीच्या जनतेवर प्रेम असते तर महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प गुजरातला न जाता वाराणसीत आले असते’, अशी टीका अजय राय यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र अद्याप वाराणसीत एकही मोठा प्रकल्प आलेला नसल्याची टीका अजय राय यांनी एका मुलाखतीत केली आहे. ”गेल्या दहा वर्षात एक वाराणसीत एकही प्रकल्प आला नाही. एक मोठी फॅक्टरी त्यांनी नाही आणली. महाराष्ट्रातून सर्व प्रकल्प गुजरातला गेले. एअरबस, चीपची फॅक्टरी महाराष्ट्रातून गुजरातला गेली. ते प्रकल्प महाराष्ट्रातून वाराणसीत येऊ शकत नव्हते का? जर यांना वाारणसीच्या लोकांबद्दल प्रेम असते तर ते प्रोजेक्ट वाराणसीत आले असते. यांना फक्त वाराणसीतील जनतेला मोठ मोठे इव्हेंट दाखवून, लेझर शो दाखवून फसवायचे आहे. खोटं बोलून यांना गुजरातच्या व्यापाऱ्यांना सर्व काम द्यायचे आहे”, अशी टीका अजय राय यांनी केली आहे.