
नऊ वर्षांपूर्वी आसाममध्ये सत्ता गमावलेली काँग्रेस राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. काँग्रेसने एकीकडे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर मांडण्याचे काम सुरू केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने आसाममधील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून भाजपच्या डबल इंजिन सरकारचे सत्य देशासमोर येईल. आसाममधील चहाच्या बागा, कामगारांच्या किमान वेतनाचा मुद्दा, कायदा आणि सुव्यवस्था आणि बेरोजगारी हे मुद्दे उपस्थित करत काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
बूथ पातळीपासून काँग्रेसची तयारी सुरू
काँग्रेसने आसाममध्ये आपले संघटन मोठ्या प्रमाणात मजबूत केले आहे. याचबाबत बोलताना राज्यातील एका महत्त्वाच्या नेत्याने सांगितले की, ”आम्ही विभागीय आणि बूथ स्तरावर आमची संघटना मजबूत केली आहे. जे काही काम शिल्लक आहे, ते आम्ही पूर्ण करू. ” पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस तयारी करत आहे. महापालिका निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सध्या काय स्थिती आहे, हे बऱ्यापैकी या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होऊ शकेल. त्यानुसार काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी आपली रणनीती तयार करू शकेल.
याचबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी एनबीटीशी बोलताना सांगितले की, आम्ही हिमंता सरकारबाबत स्थानिक पातळीवरील मुद्दे मांडण्यास सुरुवात केली आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न आणि समस्याही जाणून घेत आहोत. ते म्हणाले की, आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्याचं म्हणणं जाणून घेत आहोत. हे काम आम्ही विभागीय स्तरावर करत आहोत. एका दिवसात किमान एक विधानसभा क्षेत्र कव्हर करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.