मोदींविरुद्ध काँग्रेसची विशेषाधिकार भंगाची तक्रार

राहुल गांधींविषयी लोकसभेत जातीवाचक टिपणी करणारे भाजप नेते अनुराग ठाकूर यांचे भाषण एक्सवर प्रशंसेसह शेअर केल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची तक्रार लोकसभेच्या महासचिवांकडे केली आहे. जालंधरचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी एका पत्राद्वारे केलेल्या या तक्रारीत ठाकूर यांनी केलेली आक्षेपार्ह शेरेबाजी सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आली होती. तरीही पंतप्रधानांनी या शेरेबाजीसह एक्सवर संपूर्ण भाषणाचा व्हीडिओ शेअर करणे हे धक्कादायक आहे, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी हे भाषण शेअर करून ‘संसदीय विशेषाधिकाराचे गंभीर उल्लंघन’ करण्यास प्रोत्साहन दिले आहे. ही कृती अत्यंत आक्षेपार्ह आणि असंसदीय असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.