काँग्रेसने भाकरी फिरवली, अनेक राज्यांचे प्रभारी बदलले; रजनी पाटील यांच्याकडे पुन्हा हिमाचलची जबाबदारी

लोकसभा निवडणूक त्यांनतर हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयशाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता पक्ष संघटनेत भाकरी फिरवली आहे. काँग्रेसने राज्यांचे प्रभारी बदलून नव्या प्रभारींची नेमणूक केली आहे. तसेच पंजाब, जम्मू-काश्मीर-लडाखसाठी नव्या सरचिटणीसांची नेमणूक केली आहे. महाराष्ट्रातील रज्यसभेच्या खासदार रजनी पाटील यांची पुन्हा हिमाचल प्रदेशच्या प्रभारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.

काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी रात्री यासंदर्भात पत्रक जारी केले. यात हिमाचल प्रदेश आणि चंदीगडच्या प्रभारी म्हणून रजनी पाटील यांची पुन्हा नेमणूक केली आहे. तर राजीव शुक्ला यांना हिमाचल, चंदीगडच्या प्रभारी पदावरून हटवण्यात आले आहे. 2018 मध्ये काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना हटवून हिमाचल प्रदेशच्या प्रभारीपदी रजनी पाटील यांची नियुक्ती केली होती.

सप्टेंबर 2020 मध्ये रजनी पाटील यांना हटवून राजीव शुक्ला यांची नियुक्ती केली होती. डिसेंबर 2023 मध्ये काँग्रेस हिमाचल प्रदेश वगळून अनेक राज्यांचे प्रभारी बदलले होते. यावेळी हिमाचलसह चंदीगडची जबाबदारी राजीव शुक्ला यांना देण्यात आली होती. रजनी पाटील यांच्यावर आता नवी कार्यकारिणी बनवण्याची जबाबदारी असेल. नोव्हेंबर 2024 मध्ये काँग्रेस अध्यक्षांनी हिमाचल प्रदेशची राज्य कार्यकारिणी, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर समित्या बरखास्त केल्या होत्या.