4 जून हा मोदी-मुक्ती दिवस; काँग्रेसचे भाजपला चोख प्रत्युत्तर

केंद्रातील मोदी सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्राच्या या निर्णयाचा काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. तसेच 4 जून हा दिवस मोदीमुक्ती दिवस ​​म्हणून साजरा केला जावा, असे म्हटले आहे. या दिवशी लोकशाही निकालातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नैतिक पराभव झाला आहे. काँग्रेसने 4 जूनला मोदीमुक्ती दिवस साजरा करण्याचे आवाहन करत भाजपला जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर झाले. त्यात भाजपला केवळ 240 जागा जिंकता आल्या. अब की बार 400 ची घोषणा देणाऱ्या भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यांनी एनडीएच्या कुबड्या घेत सरकार स्थापन केले. विरोधकांच्या इंडिया ब्लॉकने भाजपला जबरदस्त टक्कर दिली. त्यामुळे भाजपला 240 जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीच्या कलातून जनतेने मोदी यांना नाकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा पंतप्रधान मोदींचा नैतिक पराभव आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे 10 वर्षांच्या मोदी यांच्या आणीबाणीसारख्या कार्यकाळातून जनतेला मुक्ती मिळाली. त्यामुळे 4 जून हा मोदी मुक्ती दिवस साजरा करावा, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्राच्या निर्णयावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. केंद्राचा हा निर्णय म्हणजे चर्चेत राहण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हटले आहे. 4 जून 2024 रोजी देशातील जनतेने दिलेले निर्णायक मत जाहीर झाले. लोकसभा निवकालातून दहा वर्षे अघोषित आणीबाणी लादलेल्या मोदी यांचा नैतिक पराभव झाला आहे. त्यामुळे हा दिवस इतिहासात मोदीमुक्ती दिवस म्हणून साजरा केला जाईल, असे रमेश यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

केंद्र सरकारने देशात आणीबाणी लागू झाल्याच्या निमित्ताने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावर काँग्रेसने 4 जून हा मोदीमुक्ती दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर करत भाजपला जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.