केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे, तेथील अतिरेक्यांच्या मतांवरच प्रियांका गांधी तिथून निवडून आल्या, असे आक्षेपार्ह वक्तव्य महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी केले होते. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून राणे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का, असा सवाल करत त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे हिंदुस्थानातील राज्य असलेल्या केरळला पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात. अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का, असा सवाल प्रदेश कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाने याबद्दल स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नितेश राणे यांचे विधान पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित करणारे असून भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा करावा, असेही लोंढे यांनी म्हटले आहे.
…हे उद्योग भाजपवालेच करू शकतात – बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ‘केरळसारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात, असे थोरात यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. जितकी जास्त बाष्कळ बडबड तितकी जास्त प्रगती हे समीकरण भाजपमध्ये असल्याने मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा तारे तोडले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी किमान आपल्या सहकाऱ्याला समजूत द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.