
लातूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्या वेळोवेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे प्रशासनाने सोडविण्याबाबत विनंती करण्यात आली. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कोणतीच ठोस कार्यवाही व उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे महानगरपालिका प्रशासन सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत झोपेचे सोंग घेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत झोपेचे सोंग घेणार्या महानगरपालिका प्रशासनाविरुध्द घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, लातूर शहरचे निरीक्षक जितेंद्र देहाडे, अॅड. किरण जाधव, फरीद देशमुख, स्मिता खानापुरे, अभय साळुंके, अशोक गोविंदपूरकर, विद्या पाटील, रविशंकर जाधव, गोरोबा लोखंडे, लक्ष्मण कांबळे, कैलास कांबळे, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, विजयकुमार साबदे, सपना किसवे, गणेश देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, व्यंकटेश पुरी, दगडू मिटकरी, आतिष चिकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लातूर शहरातील विविध समस्याबाबत मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन घंटानाद आंदोलन करण्यात आला. या निवेदनात लातूर शहरात विविध ठिकाणी भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. संबंधित कंत्राटदार रोड फोडत आहे. परंतु, काम संपल्यानंतर त्या रोडची पक्की दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरी असे नादुरुस्त रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यात यावेत. शहरात सध्या दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यावर तात्काळ उपायोजना राबवून नागरिकांना पिण्याजोगे व स्वच्छ पाणी द्यावे. शहरातील विविध भागात पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तरी तात्काळ पथदिवे दुरुस्तीचे काम करून घ्यावेत. शहरात मोकाट श्वान व मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी शहरात डॉग कॅनल उभे करावे आणि मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा सुरू करावा.
शहरांमधील वाढती रहदारी लक्षात घेता मुख्य चौकातील ट्रॅफीक सिग्नल व्यवस्थापन सुरळीत करावे. शहरातील गंजगोलाई व दयानंद कॉलेज बार्शी रोड परिसरातील फळ व भाजी विक्रेते यांना सोयीची व कायमची जागा उपलब्ध करून द्यावी. महानगरपालिका गाळे भाडे हे दिनांक ६/११/२०२३ च्या शासन परिपत्रकानुसार आकारून वर्षानुवर्ष व्यवसाय करणार्या महानगरपालिका गाळेधारकांना न्याय द्यावा, कोरोनाच्या संकट काळात सेवा देऊन शहर स्वच्छ ठेवणार्या पारितोषिक मिळवून देणार्या स्वच्छता कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावे, अशा विविध मागण्या केल्या आहेत.