
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमध्ये सामाजिक सौहार्दाला तडा गेला आहे. या पार्श्ववभूमीवर सामाजिक सलोखा, बंधुभावाची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी येत्या 8 मार्चला बीड जिल्ह्यात काँग्रेस सद्भावना पदयात्रा काढणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिली.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आज टिळक भवनमध्ये जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी सद्भावना पदयात्रेची माहिती दिली. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा दिलेली आहे. परंतु मागील काही दिवसात राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलेले आहे. यात बीड जिल्ह्याचा वारंवार उल्लेख केला जातो. या जिल्ह्यात स्त्री-पुरुष लोकसंख्येच्या गुणोत्तरातही मोठी तफावत आहे. स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न या जिल्ह्यात ऐरणीवर आला होता. त्यामुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथून पदयात्रा सुरू केली जाणार आहे, असे सपकाळ यांनी सांगितले.