
महाराष्ट्र एक मोठे राज्य असून एक मजबूत संघटनच निवडणुका लढून जिंकू शकते त्यासाठी संघटन सशक्त असले पाहिजे. महिलांची लोकसंख्या 50 टक्के आहे, ही नारीशक्ती निवडणुकीतही तितकीच महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने विजयाचा मार्ग आखून दिला आहे. भारतीय जनता पक्षाने 400 पारचा नारा दिला होता त्याला रोखण्याचे काम महाराष्ट्राने केले असून लोकसभेचा निकाल हा राज्यातील डबल इंजिनच्या सरकारला इशारा आहे, असे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी म्हटले आहे.
टिळक भवनमध्ये आयोजित महिला प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत अलका लांबा बोलत होत्या, त्या पुढे म्हणाल्या की, संघटन मजबूत करण्यासाठी सक्रीय होऊन काम करा, पक्षासाठी वेळ द्या, प्रचार व प्रसाराच्या कामात झोकून दिले पाहिजे. आजचे जग सोशल मीडियाचे असून या माध्यमातून तुमचा आवाज एका मिनिटात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचतो. देशात 70 कोटी महिला आहेत, त्यांचा आवाज बना, विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसच शिल्लक आहेत. एका बुथवर कमित कमी एक महिला अध्यक्ष नियुक्त केली पाहिजे. तीन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिला काँग्रेसने जोमाने काम करा व काँग्रेसची सत्ता आणा असे आवाहन अलका लांबा यांनी केले.
महिलांवरील कौंटुबिक हिंसाचार, अत्याचार व अन्यायवरही अलका लांबा यांनी भाष्य केले. कल्याणमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली यावर त्यांनी संताप व्यक्त केला. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून महिला काँग्रेसच्या पदाधिकारी नात्याने महिलांचा आवाज बना असेही अलका लांबा म्हणाल्या.