राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री बसणार हे स्पष्ट आहे. परंतु निवडणुकीचा निकाल लागून अकरा दिवस झाले तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे समोर आलेले नाही. मुख्यमंत्री पदावरून गोंधळ सुरू असतानाच राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाला किती मंत्रिपदे मिळणार आणि खातेवाटप यावरून महायुतीमध्ये तमाशा सुरू झाला आहे. दरम्यान आजारी पडलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. रात्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.
राज्यातील सत्तास्थापनेत आपला कोणताही अडसर नसेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील तो निर्णय आपल्यास मान्य असेल असे शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री भाजपचाच होईल, गृहमंत्री पदही भाजपकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले आहेत. गृहमंत्री, नगरविकास, महसूल आदी महत्त्वाच्या खात्यांसाठी अडून बसले आहेत. त्यातच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शिंदे गटापेक्षा विधानसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट जास्त असल्याने शिंदे गटाला जितकी मंत्रिपदे मिळणार तितकी अजित पवार गटाला मिळावीत, अशी मागणी केल्याने सत्तावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे.
दिल्लीतून ठरणार मंत्री आणि मंत्रिमंडळ फॉर्म्युला
महायुती सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांची जोरदार लॉबिंग सुरू आहे. मात्र मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत दिल्लीतील भाजप हायकमांड अंतिम निर्णय घेणार आहेत. भाजपच्या वाटय़ाला 22, शिंदे गट 12 आणि अजित पवार गटाला 10 मंत्रिपदे असे सत्तेचे वाटप होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त मंत्री, मागील मंत्रिमंडळात सुमार कामगिरी असणाऱयांना पुन्हा संधी न देता नव्या चेहऱयांना मंत्रिपदी संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
आमदारांच्या शपथविधीसाठी 7 डिसेंबरपासून मुंबईत विशेष अधिवेशन
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा गुरुवारी शपथविधी झाल्यानंतर येत्या शनिवार, 7 डिसेंबरपासून मुंबईत नवनिर्वाचित सर्वपक्षीय आमदारांच्या शपथविधीसाठी विधिमंडळाचे दोन किंवा तीन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे.
येत्या 7, 8 आणि 9 डिसेंबरदरम्यान हे अधिवेशन पार पडेल अशी माहिती देण्यात आली. तिसऱया दिवशी 15 व्या विधानसभा स्थापन झाल्यानंतर आणि सरकार स्थापन झाल्यानंतरचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे पहिले भाषण होईल. पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. विधानसभा अध्यक्षपदासाठी अॅड. राहुल नार्वेकर यांच्यासह भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
सत्तार, राठोड, तानाजी सावंत यांचा पत्ता कट होणार
मिंधे गटातील अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नये असा सूर भाजपमधून उमटला आहे. भ्रष्टाचार आणि महिलांसंबंधी आरोप ही त्यामागची कारणे सांगितली जात आहेत. मिंधे गट मात्र त्यासाठी तयार नसल्याने या तिघांविरुद्धच्या वादग्रस्त पोस्ट आज सोशल मीडियावर अचानक व्हायरल झाल्या. त्यामागे भाजपची सोशल मीडिया टीम असल्याची चर्चा होती. काहींना वादग्रस्त जीआरबद्दल आजच्या आज मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी देण्यास सांगून त्यासुद्धा व्हायरल केल्या गेल्याचे दिसून आले.
सत्तेतील वाट्यासाठी दादा दिल्लीत
सत्तेतील वाटय़ाच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीत पोहचले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते दिल्लीत आहेत. राज्यातील सत्तेत अजित पवार गटाला 11 मंत्रिपदे मिळावीत अशी अजित पवार गटाची मागणी आहे. 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदे तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद आणि पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याला राज्यपाल पद मिळावे, अशी मागणी आहे.
शिंदेंच्या आजारावर औषध सापडले, शेवटी पाच दिवसांनंतर‘वर्षा’वर परतले
महायुतीच्या नेत्यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल? याबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यात बैठक घेऊन ठरवावे, अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या होत्या. मात्र दिल्लीहून परतल्यावर शिंदे यांची तब्येत बिघडल्याने सत्तास्थापनेबाबत डेडलॉक निर्माण झाला होता. दरम्यानच्या काळात मंत्रिपदावरून शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा होती. भाजपने पद्धतशीरपणे नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचे जाहीर करत सत्तास्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. शिंदे गटाचे ठरत नसेल तर भाजप आणि अजित पवार गटाचा शपथविधी करण्याची तयारी भाजपने सुरू केली होती. यानंतर पाच दिवसांपासून आजारी असलेले शिंदे आज बरे होऊन घराबाहेर पडले. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन त्यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर ते वर्षा निवासस्थानी परतले आणि बैठकाही घेतल्या.
आज होणार भाजपची नेतानिवड, उद्या आझाद मैदानावर शपथविधी
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याने मुख्यमंत्री पद भारतीय जनता पक्षाकडेच राहणार हे निश्चित झाले आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरही शिक्कामोर्तब झाले असल्याचे सांगितले जाते. तरीसुद्धा शिष्टाचार म्हणून उद्या भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. त्यासाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन आज मुंबईत दाखल झाले. उद्या सकाळी 11 वाजता विधान भवनात भाजप आमदारांची बैठक त्यांच्या उपस्थितीत होईल. त्या बैठकीत गटनेत्याची निवड केली जाईल. त्यानंतर महायुतीची संयुक्त बैठक होईल आणि राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. गुरुवारी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, साधूसंत उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. निर्मला सीतारामन या भाजपच्या निरीक्षक म्हणून जिथे-जिथे गेल्या तिथे चर्चेतला चेहरा कधीच मुख्यमंत्री झाला नाही असा इतिहास आहे.