कायमस्वरूपी खड्डेमुक्तीसाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण आखत काम केले असले तरी सद्यस्थितीत या काँक्रिटीकरण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पालिकेकडे प्रचंड तक्रारी येत असून प्रशासनाला प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी रस्ते विभागाकडे याबाबत अहवाला मागवला आहे. यानुसार रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत कंत्राटदार आणि अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे अडीच हजार किमीचे रस्ते आहेत. यानुसार 701 किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत.
अशी आहे रस्त्यांची स्थिती
मुंबईत 2 हजार 050 किमीचे रस्ते असून यापैकी 50 टक्केहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांची काम दोन टप्प्यांत केली जात आहेत. मुंबई महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात 392 किमी, तर दुसऱया टप्प्यात 309 किमी असे एकूण 701 किमी रस्ते काँक्रिटीकरणासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे करण्यासाठी सल्लागार, पंत्राटदारांची नियुक्ती होतानाच महापालिकेचे अभियंतेही सामील असतात.
आयआयटीकडून रस्त्यांच्या देखभाल, पुनर्रचना व पुनर्वसनासाठी योग्य पद्धती निश्चित करण्यासाठी आवश्यक सल्ला देणे, आवश्यकतेनुसार तपासणी करणे, गुणवत्ता तपासणीचे निकष प्रत्येक प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार तपासणे, चाचण्या घेणे आणि गुणवत्ता नियंत्रण चाचणी अहवालांची तपासणी करणे, तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, नियमितपणे प्रकल्पस्थळास भेटी देणे अशी कामे केली जाणार आहेत.