दिल्लीत वर्षभर फटाक्यांवर पूर्ण बंदी

देशाच्या राजधानीतील हवा प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली सरकारने वर्षभरासाठी फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली असल्याची माहिती आज सर्वोच्च न्यायालयात दिली. तर हरयाणा सरकारने फक्त पर्यावरणपूरक फटाक्यांना परवानगी देऊ असे न्यायालयाला सांगितले. राजस्थानने एनसीआर क्षेत्रात फटाक्यांवर पूर्ण बंदी घातली असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने मात्र फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यास नकार दर्शवला. सर्व राज्यांनी प्रदूषणावर एकमताने निर्णय घेतला तरच एनसीआरमध्ये फटाक्यांवर बंदी लागू होईल. सध्या आम्ही उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारला दिल्लीप्रमाणे निर्णय घेण्याचे निर्देश देतो, असे न्या. अभय एस ओक आणि न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने निर्णय देताना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने 12 डिसेंबरपर्यंत दिल्ली आणि एनसीआर राज्यांना (हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान) वर्षभरापर्यंत फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यास सांगितले होते.