
गेल्या काही दिवसांत डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱयांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचे नाहक बळी गेल्याच्या घटना घडल्या. वांद्रे, अंधेरी, विलेपार्लेपासून ते संपूर्ण मुंबई उपनगरातून अनेक रुग्ण विविध उपचारांसाठी कूपर रुग्णालयात येतात, परंतु रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून कर्मचाऱयांकडून अतिशय वाईट वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज रुग्णालयावर धडक दिली आणि प्रशासनाला धारेवर धरले. शिवसेनेच्या दणक्याने कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी रुग्णांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.
शिवसेना नेते, विभागप्रमुख, आमदार अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. यावर सर्व तक्रारी रुग्णालय प्रशासन आणि पालिका प्रशासनासोबत चर्चा करून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेढेकर यांनी दिले. दरम्यान, 15 दिवसांत तक्रारी सोडवल्या नाहीतर तीक्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी महिला विधानसभा सह संघटक ज्योत्स्ना दिघे, भावना मांगेला, प्रसाद आयरे, शरद जाधव, प्रतिभा पाटील, संजीवनी घोसाळकर, प्रज्ञा सावंत, दीपक सणस, शरद प्रभू, संजय जाधव, प्रीती खारवी, छाया खानदेशी, रेश्मा राजन, राजेश नारकर, रमेश वांजळे , हृतिक मांजरेकर, महेश केणी उपस्थित होते.