दिव्यांगांची थट्टा केल्याच्या आरोपाखाली माजी कसोटीपटू युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना आणि गुरकिरत मान यांच्याविरुद्ध दिल्लीच्या अमर कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पिपलचे (एनसीपीईडीपी) कार्यकारी निदेश अरमान अली यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तसेच मेटा इंडियाच्या उपाध्यक्षा संध्या देवनाथन यांनीही चौघांची तक्रार केली आहे.
काल झालेल्या लिजंड्स वर्ल्ड चॅम्पियन्सशीपच्या फायनलमध्ये हिंदुस्थान चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा 5 विकेटनी पराभव केल्यानंतर क्रिकेटपटूंनी एक व्हिडिओ शेअर केला. त्यात युवराज, हरभजन आणि सुरेश रैना लंगडत चालताना आपल्या पाठीला पकडून सामन्यादरम्यान शरीराला झालेल्या त्रासाबद्दल आपल्या भावना व्यक्त करत होते. गेल्या 15 दिवसांत शरीराच्या भागाचे तुकडे पडल्याचे या व्हिडिओत दाखवले होते. पण त्यांचा हा व्हिडिओ दिव्यांगांच्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वाटला आणि त्यांनी पोलिसांत जाऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीत क्रिकेटपटूंना केवळ माफी मागायला न लावता त्यांना आर्थिक दंडाचीही शिक्षा द्यावी, अशी मागणी अरमान अली यांनी केली आहे.