साहेब… तुम्हीच भावी मुख्यमंत्री! बॅनरबाजीतून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. जागावाटपावरून महायुतीत मतभेद आहेतच, पण मुख्यमंत्रीपदावरूनही महायुतीत धुसफूस सुरू आहे. उत्साही कार्यकर्त्यांनी मात्र आतापासूनच बॅनर्स झळकवले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून चढाओढ सुरू आहे. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आपलेच साहेब भावी मुख्यमंत्री आहेत असे बॅनर्स लावले आहेत.

महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून चुरस रंगली आहे. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी गुलाबी रंगाच्या पार्श्वभूमीवरील अजित पवार यांचा फोटो असलेले बॅनर लावून त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनर झळकवले आहेत.

बारामतीतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपाबाहेर अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लावले गेले आहेत. माणूस जिवाभावाचा, कट्टर दादाप्रेमी, तुमच्यासाठी काय पण, एकच वादा अजितदादा अशा आशयाचेही बॅनर्स पाहायला मिळत आहेत. तशाच प्रकारे फडणवीस यांचेही बॅनर्स नांदेडच्या श्रीनगर भागात दिसून येत आहे. त्यावर सुसंस्कृत महाराष्ट्र, सुसंस्कृत पक्ष, सुसंस्कृत नेता, भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे.

चर्चा बिहार पॅटर्नची

अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी जाहीररीत्या ते बोलूनही दाखवले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात विमानतळावर अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न राबवावा आणि आपल्याला मुख्यमंत्री बनवावे असा प्रस्तावही त्यांनी ठेवला होता, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते.