निवडणुका संपल्या आहेत आणि आता लक्ष राष्ट्र उभारणीकडे वळवले पाहिजे, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी एका भाषणात दिला. तसेच निवडणूक काळात ज्या पद्धतीने सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकाटिपण्णी झाली त्यावर भागवत यांनी टीका केली.
नागपुरात आरएसएसच्या एका कार्यक्रमात बोलताना, भागवत यांनी नवीन सरकार आणि विरोधी पक्षांना सल्ला दिला ज्यामधून निवडणूक आणि प्रशासन या दोन्हीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
‘निवडणूक ही एकमत निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. संसदेला दोन बाजू असतात ज्यामुळे कोणत्याही प्रश्नाच्या दोन्ही पैलूंचा विचार करता येतो… प्रत्येक मुद्द्याला दोन बाजू असतात. जर एका पक्षाने एक बाजू मांडली तर विरोधी पक्षाने दुसऱ्या बाजूकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून आम्ही योग्य निर्णयापर्यंत पोहोचू’, असं म्हणत भागवत यांनी विरोधी पक्ष असण्याचे महत्त्व अधोरेखित केलं.
या निवडणुकीत, INDIA आघाडीमुळे काँग्रेसने चांगली मुसंडी मारली आहे, 2019 च्या 52 वरून 100 पर्यंत पोहोचली आहे. जनादेशाकडे नजर टाकल्यास भाजपला एकट्याच्या बळावर बहूमत गाठता आलेले नाही. त्यांची संख्या 240 पर्यंत खाली आहे. तर लोकसभेत विरोधी पक्षांना 234 जागा दिल्या आहेत.
भागवत म्हणाले की, दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणाला आणि कसा जनादेश मिळाला यात संघाचा काही संबंध नाही.
‘संघ प्रत्येक निवडणुकीत जनमत सुधारण्याचे काम करतो, यावेळीही केलं पण निकालाच्या विश्लेषणात अडकत नाही… लोक का निवडून येतात? संसदेत जाण्यासाठी विविध मुद्द्यांवर एकमत घडवायचे. एकमत विकसित करत जाणे ही आमची परंपरा आहे… ही स्पर्धा आहे युद्ध नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत शांतता प्रस्थापित करण्याची गरज अधोरेखित केली आणि सांगितले की हिंसाचार रोखण्यावर प्राधान्य दिलं पाहिजे. ‘मणिपूर वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे. हिंसाचार थांबवायला हवा आणि त्याला प्राधान्य द्यायला हवे’, असं म्हणत त्यांनी सरकारचे कान टोचले.
‘आम्ही अर्थव्यवस्था, संरक्षण धोरण, क्रीडा, संस्कृती, तंत्रज्ञान इत्यादी अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे… याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्व आव्हानांवर मात केली आहे’, असं म्हणत त्यांनी सरकारला जमिनीवर राहण्याचा सल्लाही दिला.