पावसामुळे भिंत कोसळून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी युवासेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे. चिपळूण येथील डीबीजे कॉलेजमध्ये भिंत कोसळून सिद्धांत घाणेकर या 19 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या विद्यार्थ्याच्या पालकांना कॉलेज, विद्यापीठ आणि सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी युवासेनेने केली.
चिपळूण येथील शिवसेना-युवासेना पदाधिकाऱयांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे डीबीजे कॉलेजमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सिद्धांत घाणेकर या विद्यार्थ्याचा झालेल्या मृत्यूस राज्य सरकारने मुंबई-गोवा हायवेलगत बांधलेल्या संरक्षक भिंतीवर कॉलेज प्रशासनाने बांधलेली वाढीव भिंत जबाबदार आहे. त्यामुळे कॉलेज आणि सरकारने याची जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांच्या पालकांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली त्यानुसार युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोलंबेकर आणि युवासेना मुंबई समन्वयक किसन सावंत यांनी कुलगुरूंच्या गैरहजेरीत प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घेऊन या विद्यार्थ्यास मदत करण्याची मागणी केली. तसेच दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याचे दहा रुपये कुलगुरू निधीकरिता घेतले जातात त्या निधीतून आपत्कालीन परिस्थितीत कॉलेजच्या प्रशासनाला मदत निधी देण्यात येतो तर विद्यार्थ्याला किंवा पालकांना देण्यात अडचण येऊ नये आणि मदत करावी अशी मागणीही युवासेनेने केली. विद्यार्थ्यांच्या शुल्कातून विमा पॉलिसी काढण्यात येते. सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क तातडीने महाविद्यालयांकडून मागावे. शिवाय सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी सूचना कॉलेजला करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.