तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. त्यानंतर तिरुपती देवस्थानला तूप पुरवणाऱ्या तामीळनाडूतील एआर डेअरी या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आल्याची घोषणा तिरुमला तिरुपती देवस्थानने केली आहे. त्याचबरोबर प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीतून तुपामध्ये प्राण्यांची चरबी असल्याचे उघड झाल्याचेही सांगितले. दरम्यान, आंध्र प्रदेशच्या तेलुगू देसम पार्टीने प्रसादाच्या लाडवात गोमांस, डुकराची चरबी आणि फिश ऑइल असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा आज पुन्हा केला आहे.
गुजरातमध्ये केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन आणि अन्न विश्लेषण तसेच अध्ययन केंद्राच्या प्रयोगशाळेने यासंदर्भातील अहवाल दिला. त्यात तुपामध्ये प्राण्यांची चरबी असल्याचे स्पष्ट झाले.
नायडू राजकारणासाठी देवाचा वापर करताहेत – जगनमोहन रेड्डी
प्रसादाचे लाडू बनवण्यात आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नाही. अनेक वर्षांपासून प्रसादाचा दर्जा कायम आहे. तसेच लाडू तयार करण्यासाठी तुपाचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे एनएबीएल अर्थात नॅशनल अॅव्रेडेशनल बोर्ड फॉर टेस्टिंग अॅण्ड कॅलीब्रेशन लॅबोरेटरीजचे प्रमाणपत्र असायलाच हवे हा नियमही कायम आहे, असे वायएसआर काँग्रेस पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले. तसेच चंद्राबाबू नायडू हे राजकारणासाठी देवाचा वापर करत असल्याचा आरोपही केला. नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून 100 दिवस केलेल्या कामांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशा प्रकारचा आरोप केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
चार टँकरमधील तूप चाचणीसाठी पाठवले
खासगी कंपनीकडून पुरवठा करण्यात आलेल्या चार टँकरमधील तुपाबाबत संशय आला. त्यामुळे या तुपाचे नमुने आम्ही चाचणीसाठी बाहेर पाठवले होते, अशी माहिती टीटीडीचे कार्यकारी अधिकारी श्यामल राव यांनी दिली. या तुपाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ते तेलासारखे अधिक दिसते. हे तूप कंत्राटदार 320 रुपये किलो इतक्या स्वस्त दराने देत होता, अशी माहितीही त्यांनी उघड केली.
आमच्या तुपाचा दर्जा चांगलाच
आमच्या तुपाचा दर्जा चांगलाच असून प्रयोगशाळेकडून घेतलेले प्रमाणपत्रही आमच्याकडे आहे, असा दावा एआर डेअरीने केला आहे. या वर्षीच्या जून आणि जुलैमध्येच आम्ही तिरुपती देवस्थानाला तुपाचा पुरवठा केला होता. तुपाची संपूर्ण तपासणी करून प्रमाणपत्र घेऊनच तुपाचा पुरवठा करण्यात आला. सध्या आम्ही देवस्थानाला तुपाचा पुरवठा करत नाही. इतर अनेक ठिकाणी आम्ही तुपाचा पुरवठा करू शकतो आणि दर्जा पाहण्यासाठी त्याची तपासणीही करू शकता, असे आव्हानही कंपनीने दिले आहे.