सामान्यांचे बजेट कोलमडले; भाज्यांची डबल सेंच्युरी कायम, कडधान्येही कडाडली

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महागाईचा मुद्दा पेटणार आहे. भाज्यांची डबल सेंच्युरी कायम असून कडधान्येही चांगलीच कडाडली आहेत. इंधनाचे दरही गगनाला भिडले असून गृहिणींच्या किचनचे बजेट अक्षरशः कोलमडलेले असून अधिवेशनात महागाईच्या मुद्दय़ावरून घेरण्यासाठी विरोधकांनी एकजुटीने व्यूहरचना आखल्याने एनडीए सरकारसाठी ही अग्निपरीक्षा असणार आहे.

मुसळधार पाऊस बळीराजासाठी आनंददायी ठरला असला तरी फळे, भाज्यांचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून पेंद्र सरकार आणि राज्य सरकाराच्या गैरव्यवस्थापनामुळे मुसळधार पावसात माल मार्केटमध्ये पोहोचतच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाज्या अक्षरशः सडून जात असून किरकोळ बाजारात येईपर्यंत भाज्या डबल सेंच्युरी गाठत असल्याचे अनेक भाजी विव्रेत्यांनी सांगितले. सेंच्युरी गाठलेला टोमॅटो अजूनही महागच असून 100 रुपयांना मिळणारी ब्रोकोली 400 रुपये किलोने मिळत आहे, तर कोथिंबिरीची जुडीही 40 रुपयांवर गेली आहे. शिमला मिर्चीही तब्बल 200 रुपये किलोने मिळत आहे, तर 120 रुपये किलोने मिळणारे आले आता 200 रुपये किलोवर गेले आहे.

‘महंगाई मॅन मोदी’ म्हणत इंडिया आघाडीने महागाईवरून एनडीएवर जोरदार निशाणा साधला आहे. टोमॅटो, कांदे, बटाटे, आले, फरसबी, दुधी, भेंडी, लसूण यांचे चढते दर एक्सवरून जनतेसमोर मांडले आहेत.

48 टक्के कुटुंबे आर्थिक तंगीने हैराण

देशातील तब्बल 48 टक्के कुटुंबे आर्थिक तंगीचा सामना करत असल्याचा आरोप ‘इंडिया’ आघाडीने केला आहे. आमदनी अठन्नी, खर्चा रुपया अशी त्यांची स्थिती असून मिळकत आणि बचत दोन्हीही घटले आहे. या पार्श्वभूमीवर सरकार यावेळच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देईल का, असा सवाल विरोधी पक्षांनी केला आहे.

कडधान्ये (प्रति किलो)    आधी      आता

साखर                      40         44

शेंगदाणा                   100         120

साबुदाणा                        50       70

चवळी                            100       120

चना डाळ                        72          88

मूगडाळ                           100      120

गहू                                28         35

मटार                              80       120

भाज्या (प्रतिकिलो)

                आधी      आता

टोमॅटो          40       100

ब्रोकोली       100      400

शिमला मिरची  60     90

रंगीत शिमला मिरची  140  200

आले              120       200

कोथिंबीर (जुडी)       10   40