घाणेरडे, घृणास्पद… आई अन् व्हायब्रेटरबाबत किळसवाणे विनोद करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन स्वाती सचदेवावर नेटकरी भडकले

समय रैना याच्या शोमध्ये आई-वडिलांच्या संबंधावर घाणेरडी टिप्पणी केल्यामुळे युट्यूबर रणवीर अलाहाबादिया अडचणीत आला होता. रणवीरविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्याच्याविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच स्टँडअप कॉमेडियन स्वाती सचदेवा हिचाही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्वातीने तिच्या खोलीमध्ये आईला व्हायब्रेटर सापडल्याचा विनोदी किस्सा सांगितला आहे. यामुळे तिच्यावर टिकेची झोड उठली असून विनोदाच्या नावाखाली अश्लीलतेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्वाती सचदेवा हिने नुकताच एक शो केला. यात ती तिची आई कशी ‘कूल मॉम’ बनायचा प्रयत्न करते हे सांगते. यादरम्यान ती सांगते की आईला तिच्या खोलीमध्ये एक व्हायब्रेटर सापडतो आणि त्यानंतर झालेला संवाद ती विनोदी अंगाने सांगण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिच्यासमोर बसलेले प्रेक्षक हसतातही, मात्र नेटकऱ्यांना विनोदाचा हा किळसवाणा प्रकार आवडलेला नाही.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी स्वाती सचदेवा हिच्यावर सडकून टीका केली आहे. कुटुंबातील प्रौढ व्यक्तींवर अश्लील विनोद करून तिने सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचा हल्लाबोल नेटकऱ्यांनी केला.

एवढेच नाही तर काहींनी तिची तुलना समय रैनाच्या शोमध्ये आई-वडिलांच्या संबंधांवर विनोद करणाऱ्या रणवीर अलाहाबादिया हिच्याशीही केली आहे. काहींनी पोलिसांनाही टॅग करत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या टीकेवर स्वातीने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

कोण आहे स्वाती सचदेवा?

स्वाती सचदेवा ही स्टँडअप कॉमेडियन आहे. दैनंदिन जीवन, नातेसंबंध आणि समाजातील घडामोडींवर ती विनोद करण्यासाठी प्रसिद्ध आहे. युट्यूबवर तिचे 9 लाखांवर फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर 1.1 मिलियन लोक तिला फॉलो करतात.