माध्यमे नव्हे ही तर गिधाडे! सत्ताधाऱ्यांच्या शाखा बनलेल्या मेनस्ट्रीम मीडियावर कामराचा फटकारा

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने आपला सत्यवचनी बाणा कायम ठेवत सत्ताधाऱ्यांच्या शाखा बनलेल्या मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांवर गुरुवारी हल्ला चढवला. माध्यमे नव्हे ही तर गिधाडे आहेत. हे लोक देशातील जनतेसाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, त्या गोष्टींचे वृत्तांकन करण्याच्या मागे लागले आहेत, अशा सडेतोड शब्दांत कामराने सत्ताधाऱ्यांचे लांगूलचालन करणाऱ्या मेनस्ट्रीम मीडियावर जोरदार फटकारा लगावला.

सत्तेच्या लालसेपोटी गद्दारी करणारा मिंधे गट तसेच ईडी आणि सीबीआयचा वापर करून दडपशाहीचे राज्य करणाऱ्या मोदी सरकारची कुणाल कामराने चांगलीच पोलखोल केली. त्यानंतर कामरा सत्ताधाऱयांच्या रडारवर आला आहे. पालिकेद्वारे स्टुडिओवर पाडकामाची कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ पोलिसांनी दोनदा समन्स पाठवले. सत्य झोंबल्याने सत्ताधारी कामरावर कारवाईसाठी मागे लागले असतानाच काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कामराच्या प्रतिक्रियेसाठी पिच्छा पुरवत आहेत. देशातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले इतर विषय दुर्लक्षित करून प्रसारमाध्यमे कारवाईकडे लक्ष ठेवून बसली आहेत. यावरून कामराने गुरुवारी ‘एक्स’च्या माध्यमातून मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांवर निशाणा साधला. सध्याच्या मुख्य प्रवाहातील माध्यमे ही सत्ताधारी पक्षाची चुकीची माहिती देणाऱ्या शाखा बनल्या आहेत. ही माध्यमे नव्हे तर गिधाडे आहेत. देशातील जनतेसाठी महत्त्वाच्या नसलेल्या विषयांवर वृत्तांकन करण्यास मागे लागली आहेत. त्यांनी उद्यापासून अनंतकाळपर्यंत दुकाने बंद ठेवली तर ते देशाचे, देशातील जनतेचे तसेच स्वतःच्या मुलांचे भले करतील, अशा शब्दांत कामराने मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांवर जोरदार टीका केली. वेगवेगळ्या कारवाईचा बडगा उगारून कामराचा आवाज दाबण्याचे प्रयत्न सरकार पातळीवर सुरू आहेत. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जोरावर कामराने सत्ताधाऱयांना जेरीला आणल्याचे स्पष्ट होत आहे.

31 मार्चला हजर राहा; ‘गद्दार’ गीतावरून पोलिसांचे समन्स

‘गद्दार’ गीतामुळे सत्ताधारी मिंधे गट प्रचंड अस्वस्थ झाला असून कामराच्या पोलीस चौकशीवर अडून बसला आहे. खार येथील स्टुडिओवर पालिकेच्या यंत्रणेमार्फत पाडकामाची कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ कामराला पोलिसांमार्फत दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. कामराची चौकशी करण्यासाठी त्याला 31 मार्चला हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

त्याला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ, मिंधे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांची धमकी

‘गद्दार’ गीत प्रचंड झोंबल्यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांकडूनही दादागिरीची भाषा सुरू असून कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ, अशी उघड धमकीच कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिली आहे. ‘गद्दार’ गीतानंतर कुणाल कामराला फोनवरून धमक्या दिल्या जात आहेत. आता तर खुद्द मंत्र्यांकडूनही जाहीर धमक्या देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. कुणाल कामराला धडा शिकवणार, असे शंभुराज देसाई म्हणाले. जर आम्ही रस्त्यावर आलो तर कामरा कुठल्या गल्लीबोळात, बिळात जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून फरफटत आणून आपटायची ताकद असल्याचेही ते म्हणाले.