Kunal Kamra- ‘त्यापेक्षा मेंटल हाॅस्पिटलमध्ये जाणं मी पसंत करेन’! असं का म्हणाला कुणाल कामरा, वाचा सविस्तर

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बिग बॉस हा बहुचर्चित शो हिंदुस्थानातील सर्वात हिट शो मानला जातो. म्हणूनच या शोमध्ये प्रतिस्पर्धी आणतानाही अनेक गोष्टींचा विचार केला जातो. बिग बॉस शो मध्ये प्रतिस्पर्धी आणणं हा खऱ्या अर्थाने कास्टिंग डिरेक्टरसाठी महत्त्वाचा टास्क असतो. म्हणूनच वादग्रस्त आणि गाजलेल्या व्यक्तींना बिग बॉसमध्ये प्रवेश मिळतो. सध्याच्या घडीला कुणाल कामरा हे नाव खूपच गाजतंय. काॅमेडियन असलेल्या कुणालने सध्या अनेकांना शिंगावर घेतल्यामुळे, कुणालचा स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झालेला आहे. त्यामुळेच कुणालकडे सध्याच्या घडीला फॅन्स एक आयडाॅल म्हणून पाहू लागले आहेत. याच संधीचा फायदा घेत बिग बॉसमध्ये कुणालने यावं असं त्याला विचारण्यात आलं होतं. परंतु कुणाल यावर म्हणाला, बिग बॉसमध्ये जाण्यापेक्षा मेंटल हाॅस्पिटलला जाणं परवडेल. कुणालने ही संधी नाकारली पण ती त्याच्या स्टाइलने.

सलमान खानच्या रिअॅलिटी शो बिग बॉससाठी प्रसिद्ध आणि वादग्रस्त स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराला संपर्क साधण्यात आला होता. कुणालने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवरील एका स्टोरीद्वारे हा दावा केला आहे. कुणालला बिग बॉसच्या एका कास्टिंग डायरेक्टरने शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली होती, पण त्याने एका मजेदार उत्तराने ही ऑफर नाकारली.

कुणालने त्याच्या इंस्टा स्टोरीमध्ये एका व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये कोणीतरी त्याला बिग बॉसमध्ये येण्याची ऑफर देताना दिसत आहे. त्या चॅटमध्ये लिहिले आहे, “मी बिग बॉसच्या या सीझनसाठी कास्टिंगचा विचार करत आहे. तुमचे नाव आमच्या लिस्टमध्ये आहे, तुमचे खरे व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी आणि प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे.” असे कुणालला सांगण्यात आले होते. याबद्दल तुमचे काय मत आहे? आपण यावर आणखी चर्चा करावी का?” असे कुणालला विचारण्यात आले होते. यावर कुणालने दिलेले उत्तर सर्वात मजेशीर होते. कुणालने म्हटलं की, “मी मानसिक रुग्णालयात गेलो तर बरे होईल.”