
मी माफी मागणार नाही अशी रोखठोक भूमिका कॉमेडियन कुणाल कामराने मांडली आहे. जे अजित पवार बोलले तेच मी बोललो. तसेच मी जिथे कॉमेडी करतो ती जागा तुम्ही तोडणार असाल तर पुढचा शो मी एलफिन्स्टन ब्रिजवर करेन असेही कामरा म्हणाला आहे.
कॉमेडियन कुणाल कामराने एक स्टँडअप कॉमेडीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबपनर गाणं केलं होतं. त्यावरून शिंदे यांचे समर्थक चिडले आणि जिथे हा शो शूट झाला होता त्या हॅबिटॅट स्टुडीओची तोडफोड केली. तसेच कुणाल कामराने माफी मागावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली.
आता कुणाल कामराने या प्रकरणी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर पोस्ट लिहून यावर स्पष्टीकरण दिले आहे. कुणालने म्हटलं आहे की मी हॅबिटॅट स्टु़डीओमध्ये शो केला. माझ्या विधानांचा आणि त्या जागेचा काही संबंध नाही. मी काय बोलावं हे कुठलाही राजकीय पक्ष ठरवू शकत नाही. मी जिथून कॉमेडी केली ती जागा तोडणे ही बाब मुर्खपणा आहे. हे म्हणजे तुम्हाला बटर चिकन वाढलं गेलं, ते तुम्हाला आवडलं नाही म्हणून एखाद्या टोमॅटोने भरेलला ट्रक उलटवून देण्यासारखं आहे. आपल्या देशात जी राजकीय सर्कस सुरू आहे त्यावर टीका करणं किंवा एखाद्या नेत्यावर विनोद करणे हे बेकायदेशीर नाही असेही कुणाल कामरा म्हणाला.
असे असले तरी माझ्यावर जी काही कायदेशीर कारवाई होईल त्याला मी सहकार्य करेन असे कामरा म्हणाला. पण एका विनोदावर चिडून ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई होईल का? मी जिथे जाऊन स्टँडअप कॉमेडी करतो ती जागा तुम्ही तोडणार असाल तर पुढच्यावेळी मी एलफिन्स्टन ब्रिजवर शो करेन. किंवा जी जागा तुम्हाला तोडायची असेल तिथे जाऊन मी शो करतो असे कामरा म्हणाला.
तसेच ज्या लोकांनी माझा नंबर लीक केला आहे, किंवा मला फोन करून धमकी देत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही केलेले फोन हे व्हॉईस मेलमध्ये जातात. तुम्ही मला ज्या धमक्या देत आहात त्या सगळ्यांची कॉल रेकॉर्ड होत आहेत असे कामराने म्हटले.
तसेच जी मीडिया या प्रकरणाचे योग्य वार्तांकरन करत आहेत त्यांनी लक्षात ठेवावे की माध्यम स्वातंत्र्यात हिंदुस्थानचा जगात 159 वा क्रमांक लागतो.
असे म्हणत मी माफी मागणार नाही असे कामराने म्हटले आहे. तसेच पहिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल बोललो तेच मी बोललो असे कामरा म्हणाला. या झुंडींना मी घाबरत नाही, हा वाद कधी संपतोय याची वाट बघत मी माझ्या घरात लपून बसणार नाही असेही कामराने सांगितले.
My Statement – pic.twitter.com/QZ6NchIcsM
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 24, 2025