Kunal Kamra- काॅमेडीयन कुणाल कामराला पोलिसांचे तिसरे समन्स; 5 एप्रिलला पुन्हा चौकशीला हजर राहण्याचे आदेश

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या, गद्दार गीतासाठी कुणाल कामराला मुंबईच्या खार पोलिस ठाण्याने पुन्हा समन्स बजावले आहे. कुणाल कामराला जारी करण्यात आलेला हा तिसरा समन्स असून, 5 एप्रिलला पुन्हा  चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. खार पोलिस स्टेशनने यापूर्वी कुणाल कामरा यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु कुणाल कामरा या दोन्ही समन्ससाठी हजर राहिला नाही.

खार परिसरातील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये, कामराने शिंदे यांच्यासाठी ‘गद्दारगीत’ गायले होते. 2022 मध्ये उद्धव ठाकरेंविरुद्ध शिंदे यांनी केलेल्या बंडाचे वर्णन करण्यासाठी कामराने ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका हिंदी गाण्याच्या आधार घेतला होता.

कामराने केलेल्या विडंबन गीतामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, त्याच्याविरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कामराच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिन्यात हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर या शोसाठी हजर असलेल्या प्रेक्षकांना पोलिसांनी नोटिस बजावल्याचा आरोप सरकारवर करण्यात आला होता. यावर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले की, कार्यक्रमात हजर असलेल्या प्रेक्षकांना कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. यावर माध्यमांशी अधिक बोलताना एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी कोणत्याही प्रेक्षकांना चौकशीसाठी किंवा जबाब नोंदवण्यासाठी बोलावलेले नाही.