
नाशिकमधील म्हसरूळ येथील 30 वर्षीय निकिता पाटोळे हिला अचानक ब्रेन स्ट्रोक झाल्याने ती कोमामध्ये गेली. घरची हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि उपचारासाठी लागणाऱ्या प्रचंड खर्चामुळे पती पंकज पाटोळे यांनी वडिलोपार्जित शेतजमीन विकण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वीच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळाली. त्वरित उपचार सुरू झाले आणि 29 दिवस कोमात असलेली निकिता शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच सर्वप्रथम नवजात मुलीला कुशीत घेऊन मायेची उब दिली तेव्हा सर्वांच्या डोळ्याच्या कडा आपसूक पाणावल्या.
निकिता आणि पंकज यांच्या घरी 7 फेब्रुवारीला एका गोंडस मुलीने जन्म घेतला. मात्र 13 फेब्रुवारीच्या रात्री निकिता बेशुद्ध पडली. तिला उपचारासाठी नाशिक येथील श्री नारायणी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड रुग्णालयात दाखल केले. तपासणीत निकिताला ब्रेन स्ट्रोक झाल्याचे निदान झाले. मेंदूच्या डाव्या बाजूस रक्तस्राव आणि सूज आल्याने ती कोमात गेली. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अंदाजे 8 ते 10 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले.
पाटोळे कुटुंबाकडे तीन लाख रुपयांचा आरोग्य विमा होता, मात्र खर्चाची रक्कम त्यापेक्षा कितीतरी जास्त होती. पंकज यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर त्वरित मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाले. लीला हिरा सेवाभावी संस्था आणि सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेकडून औषधांसाठी आर्थिक मदत मिळवून दिली.