![exibition](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/exibition-696x447.jpg)
कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक दसरा चौक येथील मैदानावर गेल्या वीस दिवसांपासून भरलेल्या हँडलुम प्रदर्शनाचा भव्य मंडप अखेरच्या दिवशी रविवारी दुपारी अचानक कोसळला. ना.. वादळ.. ना.. पाऊस तरीसुद्धा हा मजबूत मंडप पडलाच कसा, असा सवाल उपस्थित झाला. पण, आता मात्र यामागे खंडणी वसुलीचा गंभीर प्रकार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. सत्ताधारी पक्षातीलच जिल्ह्याचा प्रमुख असलेल्या आणि जाऊ तिथे खाऊ म्हणून बदनाम असलेल्या ‘भाऊ ‘ने दोन लाखांच्या खंडणीसाठीच मंडप पाडल्याची चर्चा होत असून, यामुळे देशभरातील विविध राज्यांमधून आलेल्या व्यावसायिकांमध्ये कोल्हापूरची नाहक बदनामी होत आहे.
खंडणीसाठी मध्यस्थी म्हणून विशाल नावाच्या व्यक्तीकडूनच हे प्रदर्शन भरविणाऱ्या प्रमुखाला अर्वाच्य शिवीगाळ आणि मारहाण करण्याबाबत वारंवार धमकावल्याचे आणि फोनमधील कॉल रेकॉर्डसह प्रदर्शन ठिकाणापासून त्यांना अन्यत्र घेऊन गेल्याचेही सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाल्याचे येथील काही जबाबदार व्यक्तींकडून ऐकायला मिळत आहे. सत्तेचा वरदहस्त आणि कोणाचेही पाठबळ नसल्याने ज्यांचे नुकसान झाले, त्यांनी पोलिसांत तक्रार न देताच, पुन्हा येथे परत न येण्याचा विचार करून कोल्हापूर सोडले.
दसरा चौक मैदानावर 20 जानेवारीपासून ‘हँडलुम एक्स्पो-2025’ सुरू होते. उत्तर हिंदुस्थानातील विविध व्यावसायिकांनी आपल्या कलाकुसरीच्या साहित्याचे सुमारे चाळीसहून अधिक स्टॉल्स उभारले होते. या प्रदर्शनाला ग्राहकांच्या मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळे अगोदरच आयोजक चिंतेत असताना, त्यांच्याकडे ‘भाऊ’ने दोन लाखांच्या खंडणीसाठी तगादा लावला. या प्रदर्शनाच्या आयोजनात असलेल्या स्थानिक विशाल नावाच्या व्यक्तीकडून मुख्य आयोजकांना धमकावण्याचे प्रकार होऊ लागले. पेठेच्या दादांचा वारस म्हणवणाऱ्या ‘भाऊ’ने पैसे मिळेपर्यंत त्यांची पाठच सोडली नाही. महापालिकेकडील डिपॉझिटमधील शिल्लक रक्कमेतून पैसे देण्यासाठी शिव्या आणि मारहाणीच्या धमक्याही दिल्या. प्रदर्शनाच्या ठिकाणापासून आयोजकांपैकी काहीजणांना उचलून नेऊन धमकावले. तरीही पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून प्रदर्शन सील करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. याबाबतचे संबंधितांच्या फोन कॉलमधील रेकॉर्ड आणि प्रदर्शनाच्या ठिकाणचे सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहिल्यास कोल्हापूरला न शोभणारा हा प्रकार असल्याचे दिसून येते.
मंडप व्यावसायिकाने यापूर्वी कामांत असा प्रकार कधीच झालेला नाही. आताही इतक्या दिवसांत मंडपाला काही झाले नाही, आजच हा मंडप कसा पडला, असा सवाल करत, मंडपाच्या मागील बाजूस असलेले काही लोखंडी क्रॉस अज्ञातांनी काढल्यानेच हा मंडप कोसळल्याचे सांगितले.
पुरावे असूनही सर्वच गप्प
■ विविध राज्यांतील व्यावसायिकांच्या बाबतीत खंडणीखोर ‘भाऊ’कडून आलेल्या फोनच्या रेकॉर्डिंगसह इतरही महत्त्वाचे पुरावे असतानाही त्यांच्याकडून बघ्याची भूमिका घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. कदाचित स्थानिक जबाबदार घटकांकडूनही आपल्याला मदत होणार नाही, अशी शक्यता गृहीत धरून, या आयोजकांनी कोल्हापूर सोडणे पसंत केल्याचे दिसून येते. यापूर्वी सन 2019 मध्ये सुद्धा या ‘भाऊ’ कडून धमकावून खंडणी वसुली झाली होती. याबाबतचा व्हिडीओ असल्याचे एका आयोजक महिलेने सांगितले, तर येथील अनुभव पाहता पोलिसांत जाऊन याचा काही उपयोग होणार नसल्याने यापुढे कोल्हापूरला पुन्हा प्रदर्शन भरवणार नसल्याचेही आयोजक महिलेने खासगीत सांगितले. दरम्यान, ‘भाऊ’चा हा प्रताप त्याच्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्याही कानावर गेला असला, तरी त्यांनीही ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ अशीच भूमिका घेतल्याचे चित्र आहे. खंडणीसाठी नागरिकांच्याही जीवाची पर्वा नाही
■ रविवार, दि. 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने प्रदर्शनातील साहित्य नेण्यासाठी आलेला ट्रक दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रदर्शनाच्या मुख्य दरवाजातच उभा होता. याचवेळी मागील बाजूकडून या प्रदर्शनाचा लोखंडी अँगलने मजबूत असलेला मंडप अचानक पत्त्यासारखा कोसळला. यावेळी प्रदर्शनामध्ये विक्रेत्यांसह काही नागरिकही खरेदी करत होते. कोसळलेल्या या मंडपाचा सर्व भार ट्रकवर पडल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण, अचानक झालेल्या या प्रकाराने भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक विक्रेत्यांच्या कलाकुसरीसह साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी भयभीत झालेल्या आयोजकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, याच वेळी मंडप पडण्यास संबंधित मंडप व्यावसायिकच कारणीभूत असल्याची चर्चा होऊ लागली. शिवाय आयोजकांना या व्यवसायात नुकसान झाल्याने त्यांच्यातीलच काहीजणांनी जाणीवपूर्वक हा मंडप पाडल्याची चर्चा होऊ लागली. त्याला वेगळीच कलाटणी मिळू लागल्याने आयोजकही धास्तावले.