मुंबई शहर व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. उत्तरेकडील अतिथंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने प्रवाही राहिले असून अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यभर थंडीची लाट धडकली असून तापमानात मोठी घसरण झाली आहे. या थंडीच्या लाटेमुळे ग्रामीण भागाबरोबर शहरी भागात जागोजागी शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत.
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका असून धुळय़ाचा पारा 4 अंशांच्या नीचांकी पातळीवर आहे. पश्चिम महाराष्ट्रही चांगलाच गारठला आहे. मराठवाडा, विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. एकीकडे अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून चक्राकार वा ऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपेक्षा 5.8 किलोमीटर इतकी आहे. तसेच मळभ दूर होऊन आकाश निरभ्र बनले आहे. या सर्व वातावरण बदलाने राज्यातील थंडीचा जोर वाढला आहे. अनेक शहरांमध्ये पारा 10 ते 15 अंशांच्या पातळीवर खाली आला आहे. यंदाचा नोव्हेंबर 1901 नंतरचा सर्वाधिक उष्ण महिना ठरला होता. त्याप्रमाणेच येत्या काही दिवसांत थंडीदेखील नवीन विक्रम नोंदवेल आणि डिसेंबर महिना सर्वाधिक थंड महिना ठरू शकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
निफाडमध्ये सर्वात कमी तापमान
निफाड तालुक्यात थंडीचा प्रचंड कडाका पडला आहे. निफाडमधील ओझरमध्ये रविवारी 3.8 अंश इतके किमान तापमान नोंद झाले. हे तापमान संपूर्ण राज्यातील सर्वात कमी किमान तापमान ठरले. डिसेंबरअखेरीस आणखी किमान दोन थंडीच्या लाटा धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अनेक ठिकाणी पारा 10 अंशांखाली
रविवारी पुण्याचे तापमान 9 अंशांच्या आसपास होते. पहाटे एनडीए परिसरात 8.8 अंश, तर शिवाजीनगर भागात 9 अंश तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये 10 अंश, महाबळेश्वर- 11.7 अंश, संभाजीनगर-8.8 अंश, अहिल्यानगर – 6.4 अंश, मालेगाव- 10.4 अंश, जळगाव शहरात 8.4, नागपूरमध्ये 9.4 अंश किमान तापमान नोंद झाले. तसेच जालना शहरात 9 अंश, तर गोंदियात 8.8 अंश सेल्सिअस तापमान होते.