उत्तर भारतात थंडीची लाट कायम राहणार

उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडली असून ही थंडी पुढील काही दिवस कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. डोंगराळ राज्यांमध्ये जोरदार झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमानात आणखी घसरण होऊ शकते. तसेच मैदानी भागात धुके आणि थंडीची लाटही कायम राहण्याची दाट शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, उत्तराखंडच्या विविध भागांत थंड लाटेचा इशारासुद्धा हवामान खात्याने जारी केला आहे. कश्मीरमध्ये अनेक भागांतील जलाशय आणि पाणीपुरवठा लाइन गोठल्या आहेत. देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. जम्मू-कश्मीर आणि लडाखच्या काही भागांत तापमान शून्य डिग्री सेल्सियसच्या खाली गेले आहे. 28 डिसेंबर रोजी वायव्य आणि मध्य भारतात हलका ते मध्यम पाऊस, गडगडाटी वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये, विशेषतः शिमल्यात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.